पुण्यातील वडगाव बुद्रुक येथे गौतमी पाटीलच्या कारचा अपघात झाला होता. कारने एका रिक्षाला धडक मारली होती. या अपघात प्रकरणामुळे गौतमी पाटीलवर टीका होत आहे. अपघाताच्या वेळी गौतमी कारमध्ये होती असा आरोप करण्यात आला. महाराष्ट्राचा बिहार करु नको असे म्हणत तिच्या नावाने निषेध करण्यात आला. पोलिसांनी क्लीन चीट देऊनही तिच्या अडचणीत वाढ होत असल्याचे म्हटले जात होते. या संपूर्ण परिस्थितीवर आता गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली आहे.गौतमी पाटीलने पत्रकार परिषद घेत तिची बाजू मांडली. गौतमी म्हणाली, माझी काही चूक नसताना मला गुन्हेगार ठरवले जात आहे. माझा या घटनेची काही संबंध नाही पोलिसांनी ही हे सांगितले आहे. ‘त्या’ कुटुंबाला मदत देण्यासाठी माझे भाऊ गेले होते पण त्यांनी मदत नाकारली. पोलिसांनी जेव्हा बोलवले तेव्हा त्यांना सहकार्य केले आहे आणि करणार. चंद्रकात दादांनी ते विधान केले त्यामुळे मला वाईट वाटले.
‘पण सगळेच माझ्या बाबतीत बोलतात. सगळे मला वाईटच बोलतात, कोण चांगले बोलतात? मी नाचले तरी वाईट होते आणि नाही नाचले तरी वाईटच आहे. मी जर त्या वेळी तिथे असते तर नक्कीच मी हे वाढवून दिल नसते. आता जे काही कायदेशीर आहे त्यानुसार चालेल… माझ्या नावाची बदनामी करत आहे तर मी का जाऊ???’ असे गौतमीने म्हटले.
‘चालक कुठे गेला होता हे मला माहिती नाही. चालकाची चूक झाली हे मला मान्य आहे. त्यांनी त्यावेळी तिथे मदत करायला हवी होती. जेव्हा घटना घडली तेव्हा मी मुंबईत होते. घटना घडल्यानंतर चालकाशी माझे अजूनही बोलणे झाले नाही. माझ्याकडे जी माहिती होती ती सगळी मी पोलिसांना दिली आहे. नातेवाईकाकडून वेगवेगळ्या प्रकारे पैसे मागितले जात होते. कुणी १९ लाख २० लाख रुपये मागितले जात होते, असे माझे मानलेले भाऊ मला सांगत आहेत. मला जाणीवपूर्वक यात अडकवले जात आहे असे वाटत आहे. शो बंद पाडले तर माझ्या हातावर अनेक जण आहेत त्यांचे हाल होतील’, असे वक्तव्य गौतमी पाटीलने केले.


