अहिल्यानगर केडगाव बायपास येथील अण्णाचा ढाबा या ठिकाणी मित्राच्या वाढदिवसानिमित्त जेवणासाठी गेलेल्या तरूणावर किरकोळ वादातून चॉपरने हल्ला करून जखमी करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी जयेश दत्तात्रय देवकर (वय 25, रा. लोंढेमळा, सोनेवाडी रस्ता, केडगाव) याने फिर्याद दिली आहे. जयेश याने फिर्यादीत नमूद केल्यानुसार, गुरूवारी (10 जुलै) मध्यरात्री 1.30 च्या सुमारास तो व त्याचे मित्र ओम अजय पोटे, अभिषेक विठ्ठल देशमुख, सुशांत सुखदेव विधाते, व विशाल बापु गोसावी हे ओम पोटे याच्या वाढदिवसानिमित्त जेवणासाठी अण्णाचा ढाबा येथे गेले होते.
तेथे जेवताना गप्पागप्पा आणि हशा सुरू होता. मात्र, शेजारच्या टेबलावर बसलेल्या तिघांना आपली चेष्टा चालू असल्याचा गैरसमज झाला. या वादावर समजावून सांगितल्यावरही जेवणानंतर हॉटेलबाहेर जयेश लघवीला गेला असता, त्या तिघांनी पाठलाग करत जयेश याच्यावर हल्ला चढवला. यातील एकाने चॉपरसारख्या हत्याराने त्याच्या छातीवर वार केला, तर अन्य दोघांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. जयेशने आरडाओरड केल्यावर त्याचे मित्र मदतीला धावले. या वेळी हल्लेखोरांनी सर्वांना जिवे मारण्याची धमकी -दिली आणि पळ काढला.
चौकशीत मारहाण करणार्यांची नावे सागर कोंढुळे, श्रवण काळे व निलेश पंडुळकर (पुर्ण नाव व पत्ता माहिती नाही) अशी असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


