योग दिनानिमित्त योग सत्रांबरोबरच वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमा व पर्यावरणीय उपक्रम राबविण्यात येणार – मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी
सर्व ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांचे सहकार्य घेण्यात येणार
अहिल्यानगर, – जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)-२ अंतर्गत शनिवार, २१ जून २०२५ रोजी होणाऱ्या ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समित्यांच्या सहकार्याने योग सत्रांबरोबरच वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमा व समुदायाच्या पुढाकारातून विविध पर्यावरणीय उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिली.
११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून २०२५ रोजी एक दशक पूर्ण करत आहे. या निमित्ताने देशभरात विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हे उपक्रम १० विभागांमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहेत.
कार्यक्रम क्रमांक १ – ‘योग संगम’ या अंतर्गत २१ जून रोजी सकाळी ६.३० ते ७.४५ या वेळेत प्रमुख योग सत्र होणार असून, पंतप्रधानांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) येथील राष्ट्रीय कार्यक्रमाशी समांतरपणे हा कार्यक्रम होईल. योग संगम हे व्यापक जनसहभाग व योग प्रात्यक्षिकांची परंपरा पुढे नेण्यासाठी आयोजित केले आहे.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये हे कार्यक्रम संबंधित समित्यांच्या व ‘आयुष्मान आरोग्य मंदिरां’च्या सहकार्याने आयोजित करण्यात येतील. यासाठी समित्यांनी क्यूआरकोड १ स्कॅन करून मानक कार्यप्रणाली, तर क्यूआरकोड २ स्कॅन करून संदर्भ साहित्य प्राप्त करावे.
कार्यक्रम क्रमांक २ – ‘हरित योग’
या उपक्रमांतर्गत पारंपरिक योगाभ्यासासोबत पर्यावरण शाश्वततेवर भर दिला जाणार आहे. योग सत्रांबरोबरच वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमा व इतर पर्यावरणपूरक उपक्रमांचा समावेश असणार आहे. हे सर्व उपक्रम ‘हरित योग’ अंतर्गत एकत्रितपणे राबविले जातील. आवश्यक माहिती क्यूआरकोड ३ स्कॅन करून मिळवता येईल.
यावर्षी ‘योग, आरोग्य आणि वॉश’ (पाणी, स्वच्छता आणि आरोग्य) या संकल्पनेवर आधारित उपक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये “योग फॉर वेलबिइंग अँड वॉश” संमेलनांचे आयोजन अशा ठिकाणी करणे अपेक्षित आहे, जिथे जल जीवन मिशन किंवा स्वच्छ भारत मिशन-२ अंतर्गत मालमत्ता उपलब्ध आहेत.
सर्व कार्यक्रम ‘योग संगम’ किंवा ‘हरित योग’ या मुख्य संकल्पनांशी सुसंगत असावेत.
कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला समित्यांनी संबंधित परिसर व पायाभूत सुविधा (पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य) स्वच्छ कराव्यात. लाभार्थ्यांच्या बैठका, विविध जागांवर योग सत्रांचे आयोजन, तसेच या उपक्रमांची छायाचित्रे नोंदवून दस्तऐवजीकरण करावे.
या कार्यक्रमात सर्व संबंधित घटकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, जिल्हास्तरावर त्याचा व्यापक प्रसार करावा, असे आवाहनही श्री.भंडारी यांनी केले आहे.
योग दिनानिमित्त स्वच्छता मोहिम व पर्यावरणीय उपक्रम राबविण्यात येणार – मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी
- Advertisement -


