छत्रपती संभाजीनगर येथील व्यापार्याला त्यांच्याशी असलेल्या व्यावसायिक रोष मनात धरून पाठलाग करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना केडगाव शिवारात घडली. अमोल ओमप्रकाश लढ्ढा (वय 40, रा. उदय बंगला, शिल्पनगर, आर.टी.ओ. रस्ता, छत्रपती संभाजीनगर) असे व्यापार्याचे नाव असून त्यांनी मंगळवारी (17 जून) दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात एमएच 16 सीव्ही 8334 या कार मधील अज्ञात चालक व त्याच्यासोबत असलेल्या अज्ञात दोन ते तीन व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी (16 जून) सकाळी 10 वाजता लढ्ढा हे व्यापाराच्या दृष्टीने रांजणगाव एमआयडीसी येथे मिटींगसाठी त्यांच्या एमएच 20 एफई 2550 या कारने गेले होते. दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास ते कंपनीत पोहोचले. मिटींग दुपारी 3.30 वाजता संपल्यानंतर लॉबीमध्ये त्यांना व्यापारी सुरेश धोंडीबा गवळी व सुदीप गाजरे हे संशयास्पद नजरेने पाहताना दिसले. व्यवसायविषयक मतभेद असल्यामुळे यांच्यावर संशय निर्माण झाला. लढ्ढा ब्रिटानिया कंपनीतून बाहेर पडल्यावर अहिल्यानगर- पुणे रस्त्यावर हॉटेल निल जवळ त्यांच्या कारचा दुसर्या कारने पाठलाग सुरू केला.
लढ्ढा यांनी केडगाव बायपासमार्गे दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु संबंधित कारने पाठलाग थांबवला नाही. 4.45 वाजताच्या सुमारास रंगोली चौकाच्या अलिकडे सदर कार चालकाने लढ्ढा यांच्या कारला डाव्या बाजूने ओव्हरटेक करत आडवी कार लावली. कारमधून दोन ते तीन अनोळखी इसम बाहेर आले. त्यांच्या हातात लाकडी दांडे व लोखंडी रॉड होते. या हत्यारांचा इशारा करत त्यांनी धमकीवजा हालचाली केल्या आणि कारला धडक देऊन डाव्या बाजूचे दोन्ही दरवाजे नुकसान केले. हल्ल्याच्या भीतीने लढ्ढा यांनी आपली कार हॉटेल आयरिस येथे नेऊन पोलिसांना घटनेची माहिती दिली.
दरम्यान, पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे.


