मुदतवाढीनंतर पीकविमा नोंदणीत वाढ; ८१ लाख शेतकऱ्यांची नोंद; कर्जदार शेतकऱ्यांची नोंदणी सुरू राहणार

यंदाच्या खरीप हंगामात राज्यात केंद्र सरकारच्या पीकविमा योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. जुलैअखेर विमा नोंदणीला कमी प्रतिसाद मिळाल्यानंतर दहा दिवसांची वाढीव मुदत देण्यात आली होती. मुदतवाढीनंतरही शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला आहे. १० ऑगस्टपर्यंत एकूण ८१ लाख ४० हजार ९१३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. बिगर कर्जदार शेतकऱ्यांची नोंदणीची मुदत संपली आहे. मात्र, कर्जदार शेतकऱ्यांची माहिती व विमा हप्ता भरण्यासाठी बँकांना ऑगस्टअखेरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

गतवर्षी पीकविमा योजनेचा अपेक्षित लाभ न मिळाल्यामुळे व यंदा काटेकोर निकषांमुळे शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेकडे पाठ फिरवली होती. पहिल्यांदा जुलैअखेर मुदत होती, तोपर्यंत ६१ लाख ८२ हजार २१८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. गतवर्षी सुमारे ९५ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्या तुलनेत यंदा कमी नोंदणी झाली होती. त्यामुळे नोंदणीसाठी १० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. १० ऑगस्टनंतर पीकविमा नोंदणीच्या स्थितीत समाधानकारक वाढ झाली आहे. एकूण ८१ लाख ४० हजार ९१३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात बिगर कर्जदार शेतकऱ्यांची संख्या ७७ लाख १६ हजार २४६ असून, कर्जदार शेतकऱ्यांची संख्या ४ लाख २४ हजार ६६७ आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांची नोंदणीची मुदत संपली आहे.

कर्जदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता वजा करून तो विमा कंपनीला भरण्याची तारीख ऑगस्टअखेरपर्यंत वाढवून मिळाली आहे. शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांना आपल्या सोयीनुसार संबंधित पीकविमा कंपन्यांना विमा हप्ता भरून नोंदणी करण्याची मुदत ऑगस्टअखेरपर्यंत वाढवून दिली आहे. कर्जदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता वजा करून उर्वरीत रक्कम शेतकऱ्याला कर्ज स्वरूपात दिली जाते. राज्यात गतवर्षी जुलैअखेर सुमारे ३१ लाख शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते. त्यापैकी ऊस पिकासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या सुमारे १६ लाख आहे. ऊस पिकाला पीकविमा विमा योजना लागू नाही, उर्वरित कर्जदार शेतकरी व विमा निकषांत बसणारे पिके गृहीत धरता कर्जदार विमा नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची एकूण संख्या १० लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles