कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे, अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता शिक्षण खात्याची जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नीट पेपर फुटीनंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं होतं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुरू होती. कॉकरोच जनता पार्टीकडून त्यासाठी दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावर मोठं आंदोलन उभारण्यात आलं होतं. गेल्या एक महिन्यापासून हे आंदोलन सुरू होतं. दरम्यान कॉकरोच जनता पार्टीकडून 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा देखील काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान पोलिसांकडून आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर हे आंदोलन अधिकच पेटलं. या आंदोलनाला देशभरातून व्यापक पाठिंबा मिळाला, विरोधी पक्ष देखील मैदानात उतरले, अखेर दबाव वाढल्याने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे
दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर यावर आता भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘देर आए दुरुस्त आए’ म्हणत त्यांनी यावेळी भाजपला टोला लगावला आहे. ‘श्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, मी अशी आशा व्यक्त करतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच योग्य निर्णय घेतील. मी त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो ज्यांनी आपलं आंदोलन अतिशय शांततेत संपवलं. यामुळे आता लवकरच भारताच्या शिक्षण क्षेत्रात शांती प्रस्थापित होईल. तसेच विद्यार्थ्यांना आपलं उज्जवल करिअर घडवण्यासाठी जास्तीत जास्त संधी मिळतील,’ असं आपल्या पोस्टमध्ये मुरली मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे.


