अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कामकाजाचा जिल्हाधिकारी तथा आयुक्त पंकज आशिया यांनी घेतला आढावा; नागरिकांना तातडीच्या सेवा देण्याचे निर्देश
अहिल्यानगर : महानगरपालिकेच्या विविध विभागांची आढावा बैठक जिल्हाधिकारी तथा प्रभारी महापालिका आयुक्त पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत त्यांनी सर्वच विभाग प्रमुखांकडून चालू असलेल्या योजनांची व प्रकल्पांची सविस्तर माहिती घेतली. बैठकीदरम्यान, पंकज आशिया यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून मूलभूत सुविधा तातडीने आणि प्रभावी पद्धतीने मिळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करणे गरजेचे आहे. महानगरपालिकेची जबाबदारी केवळ विकास कामे करणे इतकीच नाही, तर ती कामे वेळेत आणि दर्जेदार रितीने पूर्ण होणे ही देखील तितकीच महत्त्वाची आहे. विभाग प्रमुखांना सूचना देत असताना सांघितले की, नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर त्वरित कृती केली जावी. असे आदेश जिल्हाधिकारी तथा आयुक्त पंकज आशिया यांनी यावेळी दिली.
यावेळी आरोग्य, जलपुरवठा, स्वच्छता, बांधकाम, करसंकलन, विद्युत, बागकाम, नागरी सुविधा, मालमत्ता व्यवस्थापन, वसुली, शिक्षण आदी विभागांतील कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक विभाग प्रमुखांनी आपापल्या क्षेत्रातील प्रगती अहवाल सादर करताना येणाऱ्या अडचणी व पुढील उपाययोजना देखील मांडल्या. जिल्हाधिकारी आशिया यांनी स्पष्ट निर्देश दिले की, कामांमध्ये पारदर्शकता आणि गती येणे आवश्यक आहे. नागरिकांची सेवा हीच आपली सर्वोच्च प्राधान्यक्रम असावी. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडावी. या बैठकित उपायुक्त विजय मुंढे, डॉ.संतोष टेंगळे, सहायक आयुक्त सपना वसावा, निखिल फराटे, जल अभियंता परिमल निकम, आस्थापणा विभाग प्रमुख मेहेर लहारे, शहर अभियंता मनोज पारखे, श्रीकांत निंबाळकर, अतिक्रमण विभाग प्रमुख सुरेश इथापे, घनकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे, प्रसिध्दी अधिकारी शशिकांत नजन, संगणक विभाग प्रमुख अंबादास साळी, सर्व प्रभाग अधिकारी आणि विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.


