महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल केलं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रोहित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ईडीने पुरवणी आरोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
रोहित पवारांनी या संदर्भात एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टच्या माध्यमातून सविस्तर प्रतिक्रिया देत कोणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात ईडीने कारवाई केली हे जगजाहीर असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
“कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात ईडीने कारवाई केली हे जगजाहीर आहे. याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही. ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलं. म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे. कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईलच”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
“तसेच विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे, महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलंय, हा इतिहास आहे”, असा सूचक इशाराही आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.


