नगर: अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत दोन कोटीची मागितल्याप्रकरणी मुंबईतील तरुणी विरोधात नगरच्या कॅम्प पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्लॅकमेल करण्याच्या हेतूने दराडे यांची माहिती तिला पुरविणाऱ्यांचाही आरोपीत समावेश करण्यात आला आहे. अप्पर पोलिस अधीक्षकांनी चौकशी केल्यानंतर फिर्याद नोंदवून घेण्याचे आदेश दिल्याने कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.दराडे यांच्या मेव्हुण्याचे मुबंईत हॉटेल आहे. मेहुणा परदेशात असल्याने हॉटेल मॅनेजमेंट दराडे पाहात असताना त्यांची तिच्याशी ओळख झाली. त्यावेळी ‘ –तुम्ही पोलिस दलात आहात, मी मॉडेलिंग करते, ॲक्टरसुध्दा आहे. फिल्म इंडस्ट्रीजमध्ये काम करते, परिस्थितीमुळे पार्ट टाईम जॉब करावा लागत असल्याचे सांगणारी ती तरूणी दराडे यांना प्रामाणिक य होतकरू वाटली. ऑगस्ट 2023 मध्ये शुटिंगकरता दुबईत गेली असता तिने पैसे संपल्याचा फोन करत वीस हजाराची मागणी केली.
भारतात आल्यानंतर परत देईल, असे ती म्हणाल्याने दराडे यांनी तिला ऑनलाईन वीस हजार रूपये पाठविले. त्यानंतर ती काहीतरी कारण सांगून पाच,दहा हजार रुपयांची मागणी करत. सरळ मनाने मदतीच्या हेतूने दराडे तिला पैसे देत होते. डिसेंबर 24 मध्ये हॉटेल बंद केल्याने तिचा जॉब गेला. त्यामुळे ती पुन्हा दराडे यांच्याकडे पैसे मागत राहिली.
सोन्याची चेन गहाण ठेवली असून ती सोडविण्यासाठी 40 हजार रुपयांची मागणी करण्यासाठी ती मे 2024 मध्ये नगरला आली होती. त्यावेळी दराडे यांनी तिला 40 हजार रुपये नगर येथे रोख स्वरूपात दिले. त्यावेळी तीने बंद लिफाप्यात भावना कळवत लाईक करत असल्याचे सांगितले. मात्र दराडे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
उधारीवर घरात 44 हजार रुपयांचा टिव्ही घेवून दिला, पण ती उधारी तिने दिली नाही. ती उधारीही दराडे यांना भरावी लागली. त्यानंतर पुन्हा 25 हजार रुपये रोख दिले. लग्ऩ करा, नाहीतर अत्याचाराची केस टाकेल, अशी धमकी देत तिने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याने पोलिस निरीक्षक दराडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अज्ञाताने ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशातून दराडे यांच्यावर नजर ठेवून त्यांची माहिती तिला पुरवत असल्याने त्या अज्ञाताचाही आरोपींत समावेश करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


