गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात काल पाकिस्तानने भारतातील काही शहरांवर ड्रोन हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पाकिस्तानाच्या कृत्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युततर दिले आहे.
या घटनांमुळे सीमेलगतच्या शहरांतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भितीने नागरिकांनी अन्नधान्य आणि इंधनाच्या खरेदीसाठी धावपळ सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर चंदीगड प्रशासनाने शुक्रवारी जीवनावश्यक वस्तूंच्या साठ्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. अशा कृतींमुळे कृत्रिम टंचाई निर्माण होत आहे, किमतीत वाढ होत आहे आणि यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था बिघडू शकते, असे म्हटले आहे.
चंदीगड प्रशासनाने आज (९ मे रोजी) एक आदेश जारी केला आहे. या आदेशात, चंदीगडच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, “काही व्यक्ती, व्यापारी आणि आस्थापना पेट्रोल, डिझेल आणि इतर दैनंदिन गरजेसाठी लागणाऱ्या वस्तू, आवश्यक अन्न-धान्य आणि इंधनाचा अनधिकृत साठा करत आहेत.”
या आदेशात पुढे असे म्हटले आहे की, “अशा पद्धतींमुळे कृत्रिम टंचाई, असामान्य किंमत वाढ आणि कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत. अशी कृत्ये करणाऱ्यांना आळा घातला नाही तर सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचू शकते, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो आणि सामान्य जीवन विस्कळीत होऊ शकते.”
हा प्रकार रोखण्यासाठी, प्रशासनाने सर्व प्रकारच्या साठेबाजीवर बंदी घातली आहे. “कोणताही व्यक्ती, व्यापारी, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते किंवा व्यावसायिक आस्थापनांनी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करू नये,” असे आदेशात म्हटले आहे. यामध्ये तांदूळ, गहू, डाळी, साखर, खाद्यतेल, भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, औषधे, पेट्रोल आणि डिझेलसारखे इंधन यांचा समावेश आहे. हा आदेश ७ जुलैपर्यंत लागू राहील.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ७ मे रोजी पहाटे भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून लक्ष्य केले होते. सरकारने म्हटले आहे की, ऑपरेशन सिंदूर याद्वारे केवळ दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले होते, पाकिस्तानी नागरिक किंवा लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले नव्हते.


