अहिल्यानगर: जिल्ह्यात ८ पालिकांसाठी काल, मंगळवारी झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी आज, बुधवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली. त्यानुसार एकूण ७२.२५ टक्के मतदान झाले. एकूण ३ लाख २२ हजार २० मतदारांपैकी २ लाख ३२ हजार ६६३ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदान प्रक्रियेच्या दिवसभरात किरकोळ बाचाबाची, वादावादीचे प्रसंग वगळता शांततेत पार पडली. जमावाला पांगवण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांना बाळाचा वापर करावा लागला. मतमोजणी लांबणीवर पडल्याने उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीची भावना आहे. मतदान यंत्रे आणखी १८ दिवस सुरक्षित बंदोबस्तात ठेवावे लागणार आहेत.
एकूण १ लाख ५९ हजार ४९९ पुरुष मतदारांपैकी १ लाख १८ हजार ४३९ जणांनी मतदान केले तर एकूण १ लाख ६२ हजार ४५५ महिला मतदारांपैकी १ लाख १४ हजार १९१ मतदान झाले तसेच ६६ तृतीयपंथीयांपैकी ३३ मतदारांनी हक्क बजावला.आठ नगराध्यक्षांसह एकूण २७७ सदस्यांसाठी मतदान झाले. नगराध्यक्ष पदासाठी ६९ तर नगरसेवक पदासाठी ९२६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. भाजप नेते तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, काँग्रेसचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात व विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे, काँग्रेस आमदार हेमंत ओगले, भाजप आमदार मोनिका राजळे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या कार्यक्षेत्रातील या पालिका होत्या आहेत. कोपरगाव, देवळाली प्रवरा, नेवासे व पाथर्डी या चार पालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत.
पालिकानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे श्रीरामपूर ८० हजार ९९२ पैकी ५३ हजार ९५४ (६६.६२ टक्के), संगमनेर ५७ हजार ७१४ पैकी ४१ हजार ९८८ (७२.७५), राहुरी ३३ हजार २७० पैकी २४ हजार १०९ (७२.४८), राहता १९ हजार ४६५ पैकी १५ हजार १५७ (७७.८७), श्रीगोंदे २८ हजार ३२६ पैकी २२ हजार ६१५ (७९.८४), शेवगाव ३५ हजार ४७९ पैकी २४ हजार ४९६ (६९.०४), जामखेड ३३ हजार १६१ पैकी २५ हजार ८१ (७५.६, शिर्डी ते ३० हजार ६१३ पैकी २५ हजार २६३ (७५.१६ टक्के). एकूण ३ लाख २२ हजार २० पैकी २ लाख ३२ हजार ६६३ (७५.२५ टक्के) मतदान झाले.
मतदान झाल्यानंतर रात्रीच मतदान यंत्रे पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले. मतदानासाठी एकूण ३५८ मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. हे सर्व मतदान केंद्र सीसीटीव्ही निगराणीखाली ठेवण्यात आली होती.


