अहिल्यानगर-महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बाबुराव राजुरकर (वय 50, रा. चाणक्य चौक, बुरूडगाव रस्ता) यांना त्यांच्या कर्तव्यावर असताना माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे (रा. माळीवाडा, अहिल्यानगर) याने दमदाटी करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी डॉ. राजुरकर यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना गुरूवारी (17 जुलै) सायंकाळी घडली. तक्रारदार डॉ. राजुरकर हे जुन्या कोर्टाजवळ मनपाच्या आरोग्य विभागाच्या कामावर असताना, बाळासाहेब बोराट हा एक व्यक्तीला सोबत घेऊन घटनास्थळी आला. त्यांनी संबंधित व्यक्तीच्या आजीच्या मृत्यूच्या नोंदीबाबत चर्चा करताना डॉ. राजुरकर यांना ‘तुम्ही कामच करत नाही, तुम्ही नोकर आहात हे विसरू नका’, अशा शब्दांत दमबाजी केली. डॉ. राजुरकर यांनी बोराटेला प्रशासनाने निश्चित केलेल्या कार्यपध्दतीची माहिती देऊनही त्याने संतप्त होत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
या प्रकारामुळे डॉ. राजुरकरांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ आज (शुक्रवार) मनपा कर्मचारी युनियनच्या वतीने मनपा प्रभाग कार्यालय बंद ठेवण्यात येणार असून सकाळी 10:30 वाजता मुख्य प्रशासकीय इमारत येथे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर, बाबासाहेब मुदगल, सचिव आनंद वायकर यांनी केले आहे.


