अहिल्यानगरच्या तरूणाईच्या हातात बेड्या नको तर रोजगार हवा
आ. जगताप यांच्या वक्तव्यावर माजी महापौर अभिषेक कळमकर यांची प्रतिक्रिया
नगर: मागील काही दिवसांपासून अहिल्यानगर शहरात वादग्रस्त वक्तव्य करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करणाऱ्या सत्ताधारी लोक प्रतिनिधींनी आज रविवार झालेल्या जन आक्रोश मोर्चात तरुणांना चिथावणी देत आपला देश, धर्म सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्यातील दोन चार जण आत जण आत गेले तरी हरकत नाही असे वक्तव्य केले आहे. भारतीय संविधानानुसार लोकशाही प्रक्रियेने निवडुण येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून ही भाषा अजिबात अपेक्षित नाही. आजच्या काळात नगरच्या तरूणाईच्या हातात बेड्या नाही तर चांगल्या रोजगाराची गरज आहे. दुर्दैवाने विद्यमान लोकप्रतिनिधींना आपल्या संवैधानिक जबाबदारीचे भान राहीले नाही हे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी दिली आहे.
कळमकर यांनी म्हटले आहे की, गेली अनेक वर्षे स्वतःला कथित विकास पुरुष म्हणून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनी विधानसभा निवडणुकीनंतर भूमिका बदलली आहे. आता ते शहर विकासावर, रोजगारावर शब्द बोलायला तयार नाहीत. ऊलट ते जाहीर व्यासपीठावर तरूणाईला आत जाण्याची तयारी ठेवा असे आवाहन करत आहे. हे विरोधाभासी आहे. कोणत्याही सूज्ञ नागरिकाला ही भूमिका पचणारी नाही. आज नगरमधील हजारो युवक चांगल्या रोजगाराठी पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरला जात आहेत. याला कारण नगर शहरात रोजगाराच्या संधी नाहीत. ही वस्तुस्थिती असतात राहिलेल्या तरूणाईला कायदा हातात घेऊन तूरूंगात जाण्याचे आवाहन केले जात असेल तर कोणते पालक आपल्या मुलांना घराबाहेर सोडेल? याचा विचार आणि आत्मपरीक्षण लोकप्रतिनिधींनी केले पाहिजे. देश, महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षण दल, पोलिस दल सक्षम आहे.तरूणाईने आपली ऊर्जा देशाच्या विकासासाठी खर्च केली पाहिजे.
नगरकांनी संविधानिक जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहे. तुम्ही एकीकडे संविधानाची भाषा बोलता आणि दुसरीकडे तरुणाईला कायदा हातात घेण्याच्या सूचना करता, अशी टीका कळमकर यांनी केली आहे


