बारामतीची पोटनिवडणूक २३ एप्रिलला होणार आहे. यासाठी सोमवारी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान काँग्रेसने बारामतीत उमेदवार दिला आहे. ज्यावरुन खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसनेही त्यांना उत्तर दिलं आहे. दरम्यान या सगळ्या प्रकरणी संजय राऊत यांनीही त्यांची भूमिका मांडली आहे.
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत शरद पवारांनी जी भूमिका मांडली त्याच्याशी मी सहमत आहे. काँग्रेसला बारामतीची पोटनिवडणूक लढवण्याचा हक्क आहे कारण कौटुंबिक कारणामुळे शरद पवराांचा पक्ष ही निवडणूक लढवत नाही. अजितदादांनी लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पिंपरीची पोटनिवडणूक लढली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेसची मदत घेतली होती. त्यामुळे काँग्रेसने बारामतीत उमेदवार दिला तर काय असं घडलं असं संजय राऊत म्हणाले.
प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतली त्यांना समजावून सांगण्यात आलं याबाबत विचारलं असता राजकारणात असं काही समजावून वगैरे सांगितलं जात नाही, धमक्या दिल्या जातात. साखर कारखान्यांचे व्यवहार, इतर अनेक गोष्टी आहेत ज्याबाबत धमक्या दिल्या जातात. प्राजक्त तनपुरेंना समजावून सांगायला विखे पाटील आणि रविंद्र चव्हाण गेले होते, ते काय क्रांतिकारक वगैरे आहेत का? असाही सवाल संजय राऊत यांनी केला. शिवाय ते दोघंही फाईल घेऊन गेले असतील आणि धमक्या दिल्या असतील. जे धमक्यांना घाबरतात ते माघार घेतात. राजकारणात सहज काही मिळत नाही. तुम्हाला संघर्ष करावा लागतो, तो करायचा नसेल तर भाजपाचे गुलाम म्हणून वावरा असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. आपल्या देशात ट्रम्पशाही आहे का? आम्ही भाजपाला घाबरत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


