श्रीगोंदा-तालुक्यातील घोड धरण लाभक्षेत्रातील शेतकर्यांनी साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी घोड धरणातून पाणी देण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रस्तावामुळे घोड लाभक्षेत्रातील शेतकर्यांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.6) श्रीगोंदा येथे शेतकर्यांची बैठक झाली. या बैठकीत परिसरातील शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली भूमिका स्पष्ट केली. घोड धरणातील उपलब्ध पाणीसाठा आधीच अपुरा असून, सध्याच्या परिस्थितीत बाहेरील योजनेस पाणी वळविल्यास स्थानिक शेती, पिकांचे उत्पादन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. शेतकर्यांनी सांगितले की, घोड लाभक्षेत्रातील हजारो हेक्टर शेती या धरणावर अवलंबून आहे. जर साकळई उपसा सिंचन योजनेस पाणी देण्यात आले, तर स्थानिक शेतकर्यांचे मोठे नुकसान होईल आणि भविष्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.
बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले की, घोड धरणातील पाणी हे प्रथम स्थानिक शेतकर्यांच्या हक्कासाठी राखीव ठेवावे आणि कोणत्याही परिस्थितीत साकळई उपसा सिंचन योजनेस पाणी देऊ नये. यासंदर्भात शासनाला निवेदन देण्याचा निर्णयही घेण्यात आला. तसेच, गरज भासल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. या बैठकीस परिसरातील प्रमुख शेतकरी, कार्यकर्ते व अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राकेश पाचपुते, विजय शेंडे अजय वाबळे, राजेंद्र नागवडे, बापू भुजबळ, गोरख उंडे, सुभाष शिंदे, शहाजी इथापे आदी उपस्थित होते.


