ऑनलाईन फसवणूक करण्याचे प्रमाण सातत्याने वाढत चालले आहे. लिंक पाठवून त्या माध्यमातून फसवणूक करण्यात येत असल्याचे प्रकार तुळजापूरमध्ये समोर आला आहे. यामध्ये वडील आणि मुलाला ऑनलाईन गंडा घालण्यात आला असून तब्बल १६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत.
वेगवेगळे आमिष दाखवून फसवणूक करण्यात येत असल्याचे प्रकार नवीन राहिले नाहीत. सायबर गुन्हेगारांकडून वेगवेगळे फंडे वापरत आमिष दाखवत समोरच्याला विश्वासात घेतले जात असते. त्यांचा विश्वास संपादन करत पैशांची लुबाडणूक करण्यात येत असते. असाच प्रकार धाराशिवच्या तुळजापूर मधील पिता पुत्राबाबत घडला असून अज्ञात आरोपींनी अधिक पैशाच्या आमिषाने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
लिंकवर क्लिक करताच रक्कम गायब
कालिदास लिंबाजी गवळी व मुलगा कृष्णा याला संशयितांनी संपर्क साधला. यानंतर त्यांना अधिक पैशाचे आमिष दाखवले. यानंतर एक बनावट लिंक तयार करुन ती व्हॉट्सअँपवर पाठवत माहिती भरण्यास सांगितले. या लिंकद्वारे पिता पुत्राची १६ लाख ८५ हजार ४९८ रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आरोपींनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधुन फिर्यादीचा विश्वास संपादन करत बनावट योजनेत गुंतवले व आर्थिक फसवणूक केली.
सायबर पोलिसात तक्रार दाखल
खात्यातून रक्कम काढण्यात आल्याचे लक्षात आल्याने आपली फसवणूक झाल्याचे गवळी यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी या प्रकरणी सायबर पोलिसात तक्रार दिली असुन पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान अनोळखी व्यक्तींनी संपर्क करून दिलेल्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.


