खाजगी जागेत अंत्यसंस्कार; १५ जणांवर गुन्हा दाखल नगर तालुक्यातील घटना

खाजगी जागेत अंत्यसंस्कार; तिघांसह १५ जणांवर गुन्हा दाखल
​अहिल्यानगर : नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खाजगी जागेत विनापरवाना व बेकायदेशीरपणे अंत्यसंस्कार केल्याप्रकरणी तीन जणांसह इतर १० ते १५ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आरणगाव शिवारातील नगर-दौंड रस्त्यावरील गट क्रमांकाच्या जागेत घडली.​मिळालेल्या माहितीनुसार, संजय रुपचंद ताथेड (वय ५८, रा. जैनपार्क, अहिल्यानगर) यांच्या मुलीच्या मालकी हक्काची आरणगाव शिवारात जागा आहे. आरोपी उषा सुदाम कांबळे, डायना सुदाम कांबळे आणि विनोद शिंदे (सर्व रा. मुंबई) तसेच त्यांच्यासोबत असलेल्या १० ते १५ लोकांनी मालकाची कोणतीही परवानगी किंवा संमती न घेता या जागेवर बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी सुदाम महादेव कांबळे यांचे प्रेत त्या जागेत दफन करून अतिक्रमण केले.

​याप्रकरणी संजय ताथेड यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरोधात भादंवि संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार गागुंडे हे करत आहेत.

——————————————————————————————————————

कामावर का गेला नाही विचारल्याचा राग: पतीने पत्नीला पट्ट्याने मारले
​अहिल्यानगरमधील बुऱ्हाणनगर भागातील घटना; भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
​अहिल्यानगर – अहिल्यानगर परिसरातील बुऱ्हाणनगर येथील गुगळे कॉलनीमध्ये कौटुंबिक वादातून एका महिलेला तिच्या पतीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पती कामावर का गेला नाही असा साधा प्रश्न विचारल्याचा राग आल्याने पतीने हे कृत्य केले. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब मूळचे बीड जिल्ह्यातील आष्टी येथील असून सध्या अहिल्यानगरमध्ये भाड्याच्या घरात राहते. २४ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास, पत्नीने पतीला कामावर न जाण्याबाबत विचारणा केली. याचा राग येऊन पतीने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर कमरेच्या पट्ट्याने डोक्यात मारून दुखापत केली व जीवे मारण्याची धमकी दिली.

​या घटनेनंतर दुखापतग्रस्त महिलेवर अहिल्यानगर येथील नागरी रुग्णालयात उपचार करण्यात आले. पीडित महिलेच्या तक्रारीवरून भिंगार कॅम्प पोलिसात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मोहन भेटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles