राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. एका तरुण मुलीसोबतचे त्यांचे काही मॉर्फ केलेले फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी गिरीश महाजन यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, या छुप्या मोहिमेविरोधात सायबर सेल आणि पोलिसांकडे रीतसर तक्रार दाखल केल्याची माहिती आज त्यांनी माध्यमांना दिली.
आपली बाजू मांडताना गिरीश महाजन म्हणाले, “संबंधित मुलीचे वडील माझे अतिशय चांगले मित्र होते. दुर्दैवाने ते आज हयात नाहीत. तिची आई देखील माझ्या बहिणीसोबत कॉलेजमध्ये होती. त्यामुळे आमचे या कुटुंबाशी अत्यंत जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध आहेत. सर्वच सण-उत्सवांना हे कुटुंब आमच्या घरी हजर असते.”“माझ्या मुली जेव्हा गावाहून मुंबईला येतात, तेव्हा त्या सर्व जणी एकत्रच फिरतात. आमचे कौटुंबिक स्तरावर अनेक फोटो आहेत; अगदी माझ्या मोठ्या मुलीच्या मुलांना खेळवतानाचे फोटोही त्यात आहेत. असे कौटुंबिक संबंध असताना, गेल्या ४-५ दिवसांपासून काही लोक जाणीवपूर्वक या फोटोंचा विपर्यास करून वेगळा अर्थ लावत आहेत. माझ्या मुली माझ्यासोबत जशा सेल्फी काढतात, तसेच तिनेही काढले होते. हे सेल्फी काढताना माझ्या आजूबाजूला इतरही लोक उपस्थित होते. मात्र, बाजूच्या लोकांना क्रॉप करून (फोटोंमधून काढून) केवळ आम्हा दोघांचाच सेल्फी दाखवला जात आहे. या राजकीय द्वेषामुळे त्या मुलीची नाहक बदनामी होत असून एआय (AI), मॉर्फिंग आणि क्रॉपिंगच्या माध्यमातून हे चुकीचे फोटो पसरवले जात आहेत,” असे स्पष्टीकरण महाजन यांनी दिले.एआयच्या गैरवापराबाबत चिंता व्यक्त करताना ते पुढे म्हणाले, “आजकाल तंत्रज्ञानाचा अत्यंत चुकीच्या पद्धतीने वापर सुरू आहे. यातून एखाद्याचे चारित्र्यहनन करून त्याला आयुष्यातून उठवले जाईल, अशी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. केवळ माझा राजकीय विरोधक म्हणून हे फोटो जाणीवपूर्वक व्हायरल केले जात आहेत. आजकाल सर्वोच्च नेत्यांविषयीही असेच वाईट बोलले जाते. हे उद्योग कुठेतरी थांबले पाहिजेत आणि अशा प्रवृत्तींवर कडक कारवाई झाली पाहिजे. म्हणूनच मी या घाणेरड्या बदनामीविरोधात पोलीस आयुक्त आणि सायबर सेलकडे रीतसर तक्रार दाखल केली आहे.”
या प्रकरणाच्या पाठीमागे कोण आहे, याबद्दल अद्याप स्पष्टता नसल्याचे सांगत महाजन म्हणाले, “यात नेमका कोणाचा हात आहे, याची मला कल्पना नाही; मात्र यावर घाणेरडे राजकारण सुरू आहे. ती मुलगी एक उच्चशिक्षित डॉक्टर असून सरकारी रुग्णालयात सेवा देत आहे. तिचे लग्न जमवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. असे असताना तिचे भविष्य धोक्यात आणणे पूर्णपणे चुकीचे आहे. आपल्याला राजकारण करायचे असेल तर ते समोरासमोर दोन हात करून करू, पण अशा प्रकारे एका निष्पाप मुलीला लक्ष्य करणे अत्यंत क्लेशदायक आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन दोषींवर कडक कारवाई केली जाईल.”


