दिवाळी सुरु होण्यास काही दिवस बाकी असतानाच सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 2600 रुपयांनी कमी झाले. तर, चांदीच्या दरात देखील 4000 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळं गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे.
आज सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 5 डिसेंबरच्या वायद्याचे सोन्याचे एका तोळ्याचे दर 120023 रुपये आहेत. 8 ऑक्टोबरला सोन्याचे दर 123677 रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर सोन्याचे दर 2600 रुपयांनी घसरले आहेत.
चांदीचे दर 8 ऑक्टोबरला 153388 रुपयांवर पोहोचले होते. आज चांदीचे एका किलोचे दर 149115 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच चांदीच्या दरात 4000 रुपयांची घसरण झाली आहे.
सोन्याचे दोन दिवसांचे दर पाहिले असता दरात घसरण झाली असली तरी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या दरात 10 ऑक्टोबरला वाढ झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचे दर 892 रुपयांनी वाढून 121385 रुपयांवर पोहोचले होते. चांदीचे दर 1277 रुपयांनी वाढून 147601 रुपयांवर पोहोचले. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 120845 रुपयांवर होता. 22 कॅरेट सोन्याचा दर 120361 रुपयांवर पोहोचला आहे. 20 कॅरेट सोन्याचा दर 110694 रुपयांवर पोहोचला आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 90634 रुपये आहे.
सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.


