मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) सप्टेंबरचा हप्ता थेट पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून दिवाळी मिळालेली ही भेटच आहे. अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी ही रक्कम महिलांच्या खात्यात जमा होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले होते. मात्र सामाजिक न्याय विभागाने यासाठीचा ४१० कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग केला आहे. त्यानंतर कालपासून (शुक्रवारी, ता11) सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे.
महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी दोन महिन्यांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आतापर्यंत १ कोटी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. ज्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनाही यावेळचा हप्ता मिळाला आहे.लाडकी बहीण योजनेसाठी EKYC बंधनकारक करण्यात आलीये. आता लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) दरवर्षी केवायसी करावी लागणार आहे. त्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आलीये. पण केवायसी करताना फक्त शासनाच्या अधिकृत वेबसाईट https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc यावरच केवायसी पूर्ण करावी.
गुगलवर केवायसी करण्याच्या अनेक फेक वेबसाईट देखील समोर आल्या आहेत. त्यापैकी https://hubcomuat.in/ ही वेबसाईट गुगलवर सर्चमध्ये येत आहे. पण ही सरकारची वेबसाईट नसून फेक वेबसाईट आहे. त्याने तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो. त्यामुळे केवायसी करताना काळजीपूर्वक लक्ष द्या. लाडकी बहीण योजेनेसाठी केवायसी करताना अनेक अडचणी येत आहे. त्यात काही जणांना ओटीपी येत नसल्याने समस्या निर्माण होत आहे. आता सरकार यावर काय तोडगा काढते ही पाहणे गरजेचे आहे.


