राहुरी मतदार संघाचे वातावरण तापले ; तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा ! गोविंद मोकाटे निवडणूक लढविणार

गोविंद मोकाटे यांच्या भूमिकेने बिनविरोधच्या चर्चेला पूर्णविराम !
राहुरी मतदार संघाचे वातावरण तापले ; पक्षाबाबत सस्पेन्स ; निवडणुकीतील चुरस वाढली
राहुरी नगर पाथर्डी विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणुकीबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या मोठ्या चर्चा झाल्या. स्वर्गीय शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले बिनविरोध आमदार होणार असल्याचीही चर्चा मतदारसंघात रंगत होती. त्यातच माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांनी पूर्ण ताकतीने निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. पक्ष लवकरच जनतेला समजेल असे भाष्य मोकाटे यांनी केल्याने मतदारांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
माजी पंचायत समिती सदस्य गोविंद आण्णा मोकाटे यांनी जेऊर गणातुन पंचायत समितीची पहिली निवडणूक जिंकली होती. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व कोणताही राजकीय वारसा नसताना पंचायत समितीत मिळविलेला विजय तसेच त्यानंतर जेऊर गटातून कन्या भाग्यश्री मोकाटे हिने मारलेली बाजी नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. मोकाटे यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध राहिलेले आहेत.
शिवसेनेच्या तिकिटावर जिल्हा परिषदेत आपली कन्या भाग्यश्री मोकाटे विजयी झाल्यानंतर जेऊर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेची सांगता झाली होती. त्यावेळी गोविंद मोकाटे शिवसेनेत असतानाही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अजितदादा पवार, माजी मंत्री धनंजय मुंडे, छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्यासह विविध नेत्यांनी मोकाटे यांच्या घरी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला होता. यावरून मोकाटे यांचे पक्ष विरहित असलेले नेत्यांशी संबंध सर्वांनीच अनुभवले होते.
गोविंद आणृणा मोकाटे यांनी निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले असले तरी पक्षाबाबत मात्र त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून मोकाटे मुंबईत तळ ठोकून होते. त्यावेळी विविध पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी उमेदवारी बाबत चर्चा केल्याची ही माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांना कोणत्या पक्षाची उमेदवारी मिळणार याबाबत मतदारांमध्ये विविध तर्क लावले जात आहेत. मोकाटे यांनीही सस्पेन्स राखत जनतेला लवकरच पक्ष समजेल असे भाष्य केल्याने निवडणूकीत कमालीची उत्सुकता वाढली आहे.
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना आमदार होण्यासाठी मोकाटे यांनी प्रचाराची मोठी धुरा सांभाळली होती. तसेच माजी खासदार सुजय विखे यांच्या लोकसभेच्या निवडणुकीत मोकाटे यांनी पक्षादेश डावलुन विखे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवला होता. तसेच मागील लोकसभा निवडणुकीत खासदार निलेश लंके यांच्या प्रचारातही मोकाटे सक्रिय होते. मोकाटे यांना मानणारा मोठा वर्ग मतदार संघामध्ये आहे. मोकाटे यांनी वैयक्तिक मतदारसंघातील विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आर्थिक सहाय्य केलेले आहे. तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या माध्यमातूननही विविध विकास कामे मार्गी लावले आहेत.
मोकाटे यांनी दोन एप्रिल रोजी विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले. मतदार संघातील तरुण तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आग्रहाखातर निवडणूक पूर्ण ताकतीने लढवणार आहे. राहुरी पाथर्डी तसेच नगर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते मतदार उमेदवारी करण्याबाबत आग्रह करत असल्याचेही मोकाटे यांनी सांगितले. मोकाटे यांच्या भूमिकेमुळे निवडणूकीत चुरस निर्माण होणार असून बिनविरोध निवडणुकीच्या चर्चांना मात्र पूर्णविराम मिळाला आहे.

मोकाटे यांनी यापूर्वी पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच विधानसभेची देखील निवडणूक लढविलेली आहे. त्यामुळे मतदार संघातील घरोघरी मोकाटे यांचे नाव व त्यांच्या कार्याची माहिती सर्वसामान्य मतदारांना आहे. गोविंद आण्णा मोकाटे यांचे सामाजिक कार्य व विरोधकांची मोट बांधण्यात त्यांनी मिळविलेले यश यामुळे निवडणुकीत रंगत भरली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles