आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का बसल्यानंतर काही तासांतच गुजरात टायटन्सच्या संघावर आणखी एक संकट कोसळले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून अंतिम फेरीत पराभव स्वीकारल्यानंतर संघ हॉटेलकडे परतत असताना त्यांच्या बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा 37 सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये खेळाडू जीव वाचवण्यासाठी बसमधून बाहेर पडताना आणि रस्त्याच्या कडेला धावताना दिसत आहेत. या घटनेमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सुदैवाने सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला वेळेत बसमधून बाहेर काढण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर गुजरात टायटन्सचा संघ हॉटेलकडे रवाना झाला होता. मात्र, प्रवासादरम्यान बसमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि काही क्षणांतच धुराचे लोट बाहेर येऊ लागले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत चालकाने तातडीने बस थांबवली.
बस थांबताच खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला त्वरित खाली उतरवण्यात आले. काही खेळाडू रस्त्याच्या कडेला उभे राहिले, तर काहींनी सुरक्षिततेसाठी झाडाझुडपांच्या दिशेने फिरताना व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. काही क्षणांसाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने सर्वांना वेळेत बाहेर काढण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.
https://x.com/KamitSolanki/status/2061284236691382493?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2061284236691382493%7Ctwgr%5Ed93aa531d811f6367dcc3b72ecc4f973d4c3bc3e%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fsports%2Fcricket%2Fgujarat-titans-team-bus-fire-after-ipl-2026-final-37-seconds-gt-bus-fire-video-shubman-gill-marathi-news-1426324
आग लागल्यानंतर संघातील सदस्यांना जवळपास एक तास रस्त्यावरच थांबावे लागले. त्यानंतर प्रशासन आणि संघ व्यवस्थापनाने पर्यायी वाहनांची व्यवस्था केली. सर्व खेळाडूंना आणि स्टाफ सदस्यांना सुरक्षितपणे हॉटेलमध्ये पोहोचवण्यात आले.


