Saturday, February 21, 2026

नगर शहरात अतिवृष्टी…सीना नदीला पुर पावसाने संपूर्ण शहराची दाणादाण ,मनपा प्रशासनाचे ढिसाळ नियोजन

नगरचा नरक करणाऱ्या प्रशासनाने अहिल्यानगरकरांना होड्या उपलब्ध करून द्याव्यात – किरण काळे यांची मागणी

मान्सूनपूर्वीच शहर पाण्याखाली, ही नैसर्गिक आपत्ती नव्हे तर शहर ढिसाळ नियोजनाचे बळी

प्रतिनिधी : अजून मान्सूनच्या पावसाला सुरुवात झालेली नाही. अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो आहे. या पावसानेच संपूर्ण शहराची दाणादाण उडाली असून शहराचा नरक झाला आहे. मान्सून पूर्वीच शहर पाण्याखाली गेले आहे. ही नैसर्गिक आपत्ती नव्हे तर शहर ढिसाळ नियोजनाचे बळी ठरत आहे. नियोजन शून्य कारभार करणाऱ्या मनपा प्रशासनाने अहिल्यानगरकरांना प्रवासासाठी होड्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी खोचक जाहीर मागणी ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख किरण काळे यांनी केली आहे.

काळे यांच्या या अनोख्या मागणीची समाज माध्यमांवर चांगलीच चर्चा सुरू आहे. काळे यांनी म्हटले आहे, सीना नदीवरील नगर कल्याण रोडवरील प्रस्तावित पुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. अनेक वेळा याची पाहणी झाली. आश्वासने दिली गेली. मात्र प्रत्यक्षात आजवर कामाला सुरुवात नाही झाली. विशेषतः वारुळाचा मारुती, नेप्ती नाका, कायनेटिक चौका जवळील सीना नदीवरील पूल या परिसरामध्ये काही ठिकाणी पुलाच्या वरून तर काही ठिकाणी पूलाला लागून पाणी वाहते आहे.

सीना नदी पात्राच्या खोलीकरण व रुंदीकरणाचा विषय देखील प्रशासन मार्गी लावू शकलेले नाही. सीना आता नदी राहिली नसून त्याचा नाला झाला आहे. या पात्रात बहुतांश ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वनस्पती पसरली आहे. नाले सफाई मोहिमेत याची स्वच्छता होण्याची गरज होती. मात्र हे काम अपूर्ण आहे. परिणामी नदीला पूर आला असून हजारो नागरिकांचा मुख्य शहराशी असणारा संपर्क तुटला असून दळणवळण थांबले आहे. शहराच्या बाजारपेठेसह सावेडी, केडगाव, बोल्हेगाव, नागापूर सर्वच उपनगरांमध्ये रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे नागरिकांना गाडीवरून प्रवास करणे अशक्य होत आहे. जनजीवन, दळणवळण सुरळीत चालायचं असेल तर आता एकच पर्याय उरला आहे. मनपा प्रशासनाने तात्काळ नागरिकांना होड्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी खोचक जाहीर मागणी काळे यांनी केली आहे.

आपत्ती काळात शिवसेनेशी संपर्क साधा :
शहरातील सद्य आपत्ती जनक परिस्थितीमध्ये नागरिकांना प्रशासनाचा प्रतिसाद मिळत नसल्यास त्यांनी शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या ९०२८७२५३६८ त्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन किरण काळे यांनी केले आहे. शिवसैनिक अशा प्रसंगी नागरिकांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी प्रयत्नशील राहतील असे त्यांनी म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles