नगर तालुक्यात पावसाचा रुद्रावतार गावाला पाण्याचा वेढा ट्रॅक्टर, जनावरे पुरात गेली वाहून

नगर तालुक्याच्या दक्षिण भागात मंगळवारी (दि.27) पावसाचा रुद्रावतार पाहायला मिळाला. सुमारे चार ते पाच तास चाललेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील पूर्णा आणि वालुंबा नद्यांना पूर आला. या पुरात खडकी आणि वाळकी गावाला पाण्याचा वेढा पडला. तसेच भोरवाडीचा संपर्क तुटला. वाळकीच्या बाजारतळात पुराचे पाणी घुसले. नदीच्या पुरात खडकीमधील आठजण अडकले. पुरामुळे नगर-दौंड मार्ग 50 वर्षांत प्रथमच वाहतुकीसाठी बंद झाला.

दरम्यान, सायंकाळी उशीरापर्यंत खडकी गावातील 10 आणि वाळकी गावातील 15 अशा 25 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. मंगळवारी सकाळी 11 वाजता तालुक्यातील पिंपळगाव कौडा, कामरगाव, भोरवाडी, अकोळनेर, अस्तगाव, घोसपुरी, सारोळा कासार, देऊळगाव आदी परिसरात जोरदार पावसाला सुरूवात झाली. या गावांमध्ये मुसळधार पावसामुळे या भागातील पूर्वा नदी आणि वालुंबा नदी या दोन्ही नद्यावरील बंधारे ओव्हरफ्लो झाले. घोसपुरी, सारोळा कासार, अस्तगाव येथील पावसामुळे पूर्वा नदीला तर पिंपळगाव कौडा आणि कामरगाव या गावातील पावसामुळे वालुंबा नदीला पुर आला. नगर-दौंड मार्गावर असणार्‍या खडकी गावात या दोन्ही नद्यांचा संगम होतो. या दोन्ही नद्यांच्या पुराचे पाणी खडकी गावात शिरल्याने खडकीला पुराचा वेढा पडला.

याठिकाणी लष्कराच्या वतीने मदत कार्य राबविण्यात येत आहे. यात खडकी येथून 10 आणि वाळकी येथून 15 जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडून मदतीची विनंती प्राप्त झाल्यानंतर भारतीय सैन्याने तात्काळ मदत पथक तैनात करून बचाव व मदत कार्य सुरू केले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली.

खडकी गावाला पुराचा वेढा पडल्याने नगर-दौड मार्गावरील पुलावरून पाणी वाहू लागले. पाण्याचा प्रवाह आणि वेग जास्त असल्याने या मार्गावरील वाहतूक 50 वर्षांत प्रथमच बंद झाली आहे. तसेच अरणगाव-वाळकी मार्गावरही पुराचे पाणी घुसले होते.

ट्रॅक्टर, जनावरे पुरात वाहून गेली
सारोळा कासार येथील राजाराम धामणे यांचे ट्रॅक्टर ट्रेलर आणि नांगर पुराच्या पाण्यात वाहून गेले. दूध प्रकल्पातही पाणी घुसले. तसेच गोरक्षनाथ काळे यांचे चार एकर क्षेत्र पूर्णपणे वाहून गेले. खडकीमधील अनेक पाळीव जनावरे पुरात वाहून गेली.

तालुक्यातील भोरवाडी येथील पासपरा तलाव पूर्ण भरल्याने तो फुटण्याची शक्यता गावकर्‍यांनी व्यक्त केली. गावातील जवळपास 15 नाला बल्डींग पुराच्या पाण्याने फुटले. अनेक लोकांच्या घरात पाणी शिरले. गावात येणारे सर्व मार्ग पुराने वेढल्याने भोरवाडीचा संपर्क तुटला.

कामरगाव, पिंपळगाव तलाव ओव्हरफ्लो
कामरगाव, पिंपळगाव कौडा येथील पाझर तलाव जोरदार पावसाने ओव्हरफ्लो झाला. याचे पाणी वालुंबा नदीत घुसल्याने पुराच्या पाण्याने पुढील गावांची दाणादाण उडाली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles