Sunday, December 7, 2025

अहिल्या नगर जिल्ह्यात हनीट्रॅप, सरकारी नोकरदारास लुटले तीन तरूणींविरोधात गुन्हा दाखल दाखल

मुंबई, पुणे, संभाजीनगर, अहिल्यानगर नंतर आता हनीट्रॅपचे लोण थेट अकोले-संगमनेरात पोहचले आहे. परपुरुषाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यास वारंवार ब्लॅकमेलिंग करण्यात आले असल्याचा धक्कादायक प्रकार अकोले तालुक्यात उघडकीस आला आहे. संबंधित संगमनेरच्या एका नोकरदाराच्या फिर्यादीवरून संगमनेर, अकोले, संगमनेर आणि सिन्नरच्या प्रत्येकी एक अशा तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करून अशाप्रकारे अनेकांना या महिलांकडून गंडा घालण्यात आला असावा. त्यामुळे अशाप्रकारे धमकावून मारहाण करून अनेकजण कर्जबाजारी झाल्याचे बोलले जात आहे. संबंधित महिलांकडून अल्पवयीन मुलींचा सुद्धा वापर झाला असल्याची कुजबुज ऐकायला मिळत आहे. संगमनेर तालुक्यातील एका 38 वर्षीय व्यक्तीने मागील दोन महिन्यांच्या काळात आपली या महिलांकडून फसवणूक झाली असल्याची कैफियत अकोलेचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्यासमोर सांगितली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एका महिलेस व तिच्या साथीदारास रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्राजक्ता, कविता व छाया नामक तीन तरूणींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित संगमनेर तालुक्यातील व्यक्तीचे संगमनेर येथील कविता नामक तरूणी सोबत ओळख झाली. दोघांनीही एकमेकांचे मोबाईल नंबर घेऊन बोलणे सुरू केले. यानंतर काही दिवसांनी कविता हिने संबंधित व्यक्तीस संगमनेर येथे भेटण्यासाठी बोलावले. त्यावेळी तिने संबंधित व्यक्तीस वडगावपान येथे महत्त्वाच्या कामाला जायचे असल्याचे सांगून त्यास सोबत नेले. तेथे पोहोचल्यावर कविताने संबंधित व्यक्तीस प्रेमाच्या आणाभाका दिल्या. त्यावर संबंधित व्यक्तीने आपले लग्न झाले असून मला दोन मुले असल्याचे सांगितले. त्यामुळे मी असे काही करणार नाही असे स्पष्ट केले. त्यावर कविताने ही गोष्ट तुझ्या बायकोला व माझ्या नवर्‍याला समजणार नाही याची दक्षता घेऊ असे सांगितले. असे सांगून वडगावपान येथील एका लॉजवर घेऊन गेली. त्यानंतर मी माझ्या घरी निघून गेलो.त्यानंतर दोन दिवसांनी कविताने अकोले येथील तिची मैत्रीण छायाचा नंबर दिला. व तिला तुमच्यासोबत बोलायचे आहे असे सांगितले. त्यानुसार संबंधित व्यक्तीने छायास हीस फोन केला. त्यावर थेट तिने तुम्हाला प्रेम करायला कविता सारख्या महिला देते, तुम्ही अकोलेला या, असे सांगितले व एका इसमाचा नंबर दिला. व मी त्या इसमास फोन केला. त्याने तुम्ही वीरगाव रोडवरील खडी क्रेशर जवळ या, मी तुम्हाला तेथेच भेटेल असे सांगितले.त्यानंतर एक तासाने मी संगमनेर येथून अकोले येथे आलो व तेथे गेल्यानंतर संबंधित इसमाने मला खडी क्रेशर जवळील एका खोलीमध्ये नेले. तेथे एक महिला होती. तिच्याशी गप्पा मारत असतानाच मी खोलीच्या बाहेर जायला निघालो, तेव्हा खोलीचा दरवाजा बाहेरून बंद होता, त्यामुळे मी आरडाओरडा केल्यानंतर बाहेरील इसमाने खोलीचा दरवाजा उघडला. तेव्हा तेथे एक महिला व इतर पुरुष उभे होते. त्यातील एक पुरुष मला बोलला की, ही माझी पत्नी आहे, तू तिच्यासमवेत काय करत आहे? असे बोलून आमची शूटिंग चालू केली व मला मारायला सुरुवात केली. मला मारहाण केल्यानंतर ती महिला मला म्हणाली की, हे सर्व मिटवायचे असेल तर आता आम्हाला एक लाख रुपये द्या, हे प्रकरण येथेच मिटवून टाकू, तुम्ही जर पैसे दिले नाही तर मी पोलीस स्टेशन येथे जाईल व तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल करेल अशी धमकी दिली.

माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. मी तुम्हाला सात हजार रुपये कॅश व आठ हजार ऑनलाईन देतो असे सांगितले. त्याप्रमाणे पंधरा हजार रुपये त्या महिलेला फोन पे द्वारे दिले. तेथून मी संगमनेर येथे माझे घरी निघून गेलो. त्यानंतर दुसर्‍या दिवशी संबंधित महिलेने तिच्या मोबाईल वरून कॉल केला व कालच्या एक लाख रुपयांतून उरलेली रक्कम मला द्या, अन्यथा मी पोलीस स्टेशन येथे जाऊन तुमच्याविरुद्ध तक्रार करेल असे बोलल्याने मी घाबरलो. व तिने मला अकोले येथे बोलावून घेतले. तेथे गेल्यानंतर तिने तिचे नाव प्राजक्ता असे सांगितले व पैसे आणले का? असे विचारल्यावर मी तिला हो बोलून तिच्या हातात कॅश 45000 दिले व पैसे देऊन पुन्हा संगमनेर येथे घरी निघून गेलो. त्यानंतर वेळोवेळी सदर महिलेने मला धमकी देऊन दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी तिच्या फोन पे नंबर वर दहा हजार रुपये पाठवण्यास सांगितले. दिनांक 27 ऑगस्ट रोजी संगमनेर बसस्थानक येथे कॅश 14 हजार रुपये दिले व ती महिला मला पुन्हा कॉल करून पैशांची मागणी करू लागली. 29 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता त्या महिलेने मला फोन करून, तुम्ही आज जर मला पैसे दिले नाही तर त्या दिवशीचा मी तुमचा तुम्हाला मारलेला व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली.त्यानंतर मी तुम्हाला आज तुमचे पैसे देऊन टाकतो. फक्त माझा व्हिडिओ व्हायरल करू नका अशी विनवणी करून फोन बंद केला. परंतु त्या महिलेच्या रोजच्या जाचाला व धमकीला कंटाळून अखेर दिनांक 29 ऑगस्ट रोजी अकोले पोलीस स्टेशन येथे आलो व पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना घडलेली सर्व घटना सांगितली. त्यानुसार दोन पंचांना बोलावून 500 रुपयाच्या बारा नोटा असे सहा हजार रुपये माझ्याकडे देऊन तुम्ही तिला पैसे देण्यासाठी अकोले येथील सुगाव फाटा येथे थांबून राहा,आम्ही बाजूला सापळा लावून थांबतो असे पोलीस निरीक्षक बोरसे यांनी सांगितले, त्यानुसार मी महात्मा फुले चौक येथे जाऊन थांबलो. काही वेळाने संगमनेर रोडने एका रिक्षा मधून प्राजक्ता व एक इसम तेथे आले. माझ्याजवळ येऊन प्राजक्ताने माझ्याकडून पैशाची मागणी केली. तेव्हा मी त्या महिलेला माझ्या खिशात असलेले सहा हजार रुपये काढून दिले. तिने माझ्या हातातून पैसे घेताच पोलिसांनी पंचांसमक्ष हिला ताब्यात घेऊन पंच व पोलिसांनी सदर महिलेचे पंचांसमोर झडती घेतली. तिच्याकडे सदर पाचशे रुपयांच्या सहा हजार रुपयांच्या नोटा आढळून आल्या.

त्यानुसार 29 जून ते 29 ऑगस्ट या काळात कविता, छाया, प्राजक्ता यांनी कटकारस्थान करून त्यांच्या ओळखीचा फायदा घेऊन रोडवरील खोलीवर बोलावून खोलीमध्ये मी एकत्र गप्पा मारत असताना माझा व्हिडिओ तयार करून मला शिवीगाळ करून मारहाण केली तसेच व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी माझ्याकडून 84 हजार रुपये रोख तसेच फोन पे पद्धतीने घेऊन पुन्हा माझ्याकडून सहा हजार रुपये घेतले असताना पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. संबंधित लोकांनी वेळोवेळी मला धमकावून मारहाण करून बळजबरीने खंडणीच्या स्वरूपात रोख रक्कम घेऊन माझी फसवणूक केली असल्याची फिर्याद संबंधित संगमनेर तालुक्यातील इसमाने दिल्यावरून अकोले पोलिसांनी तिघींवरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खांडबहाले हे करत आहेत. अशा प्रकारे कुणा पुरुषाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा. त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. संबंधित महिलांविरुद्ध रीतसर गुन्हा दाखल करण्यात येईल.असे आवाहन पोलिस निरीक्षक मोहन बोरसे यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles