नगर-दुधसागर सोसायटी, केडगाव, येथील गणपती मंडळासमोर किरकोळ वादातून एका युवकाला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (29 ऑगस्ट) रात्री घडली. भागवत एकनाथ आव्हाड (वय 20, रा. दुधसागर सोसायटी, केडगाव) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रतिक शिंदे, आकाश ठोकळ, अजिंक्य आरू, यश मतीन (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. दुधसागर सोसायटी, केडगाव) आणि त्यांच्यासोबतच्या तीन ते चार अनोळखी व्यक्तींविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भागवत आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी रात्री 9:30 ते 9:40 च्या सुमारास शिंदेच्या किराणा दुकानाजवळील गणपती मंडळासमोर ते आणि त्यांचा मित्र यश ससाणे उभे होते. त्याचवेळी प्रतिक शिंदे, आकाश ठोकळ, अजिंक्य आरू, यश मतीन आणि इतर तीन-चार व्यक्ती यश ससाणेसोबत वाद घालत होते.
भागवत यांनी मध्यस्थी करत वाद थांबवण्यास सांगितले. याचा राग आल्याने संशयित आरोपींनी भागवत यांना शिवीगाळ करत मारहाण केली. प्रतिक शिंदे आणि आकाश ठोकळ यांनी कड्याने, तर अजिंक्य आरू आणि यश मतीन यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. भागवत यांनी आरडाओरड केल्याने संशयित आरोपी पळून गेले. मित्र अनिकेत पवार आणि जय बळेकर यांनी भागवत यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी नेले. उपचारानंतर भागवत यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दाखल केली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.


