पाथर्डी-तालुक्यातील मिरी येथे घडलेल्या थरारक खूनप्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. दोन गुंठे जागेच्या विक्रीतून मिळालेल्या पैशाच्या वाटपावरून नातवानेच आपल्या 75 वर्षीय आजीचा खून करून तिचे प्रेत घरातच जाळल्याचे धक्कादायक वास्तव तपासात उघड झाले आहे. पाथर्डी पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी सचिन सुरेश मैंदड (वय 30, रा. माळवाडी, वडगाव गुप्ता, जि. अहिल्यानगर) यास अटक केली असून, न्यायालयाने त्याला 13 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, दि. 6 ते 8 मे 2025 या कालावधीत मिरी येथे किसनबाई छगन मैंदड (वय 75) या वृद्ध महिलेला कोणीतरी अज्ञात इसमाने निर्दयपणे मारहाण करून तिचा खून केला. पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने आरोपीने तिचे प्रेत घरातच जाळून टाकले. या घटनेची माहिती मिळताच, मयत हिची मुलगी छाया हरीश्चंद्र खोसे (रा. निंबेनांदूर) हिने पाथर्डी पोलिसात फिर्याद दिली होती. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.तपासादरम्यान पोलिसांनी विविध तांत्रिक पुरावे, चौकशी आणि माहितीच्या आधारे तपासाचा मागोवा घेतला असता, हा गुन्हा मयत किसनबाई यांचा नातू सचिन सुरेश मैंदड याने केल्याचे निष्पन्न झाले. मयत किसनबाई यांनी त्यांच्या नावावर असलेली दोन गुंठे जागा 12 लाख रुपयांना विकली होती. त्या रकमेतून दोन्ही नातवांना सचिन आणि चैतन्य मैंदड यांना प्रत्येकी 5 लाख रुपये दिले होते. मात्र, उर्वरित 1 लाख 80 हजार रुपये मयत हिने मिरी येथील एका बँकेत फिक्स डिपॉझिट केले होते आणि त्या डिपॉझिटचा वारस चैतन्य सुरेश मैंदड असे नमूद केले होते. याच कारणावरून आरोपी सचिनच्या मनात राग निर्माण झाला होता. त्यामुळे तो आजीसोबत सतत भांडत असे.संक्रांतीच्या दिवशीही त्याने आजीला मारहाण केली होती. त्यानंतरही वृद्धेला रुग्णालयात न नेता जखमी अवस्थेत घरी सोडून दिले. अखेर 6 मे रोजी आरोपीने रागाच्या भरात आजीचा खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी तिचे प्रेत जाळून टाकले. या प्रकरणात आरोपी सचिन सुरेश मैंदड यास 8 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर 13 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी हे करत असून तपास पथकात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन दराडे, बाबासाहेब बडे, ज्ञानेश्वर इलग, इजाज सय्यद यांचा समावेश आहे.
पाथर्डी तालुक्यात नातवाने आजीचा खून करून घरातच जाळले प्रेत
- Advertisement -


