उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल (21 जुलै) आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजीनामा देताना त्यांनी पंतप्रधानांसह सर्व मंत्रीमंडळाचे आभार मानले. त्यांच्या कार्यकाळाची मुदत ऑगस्ट 2028 पर्यंत होती. नुकतेच धनखड यांचे एम्समध्ये हृदयाचे ऑपरेशन झाले होते. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसभर किंवा त्याच्याही आधी देशभरात दौरे करताना त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचा अंदाज कोणालाही आला नव्हता. राज्यसभेत धनखड यांनी दोनदा भाषण देखील केले. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक देखील त्यांच्या दालनात झाली होती. मात्र त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला तर नवे उपराष्ट्रपती कोण होणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. यात महाराष्ट्रातील एका नेत्याचे नाव आघाडीवर आहे.
धनखड यांचा राजीनामा स्वीकारला तर नवे उपराष्ट्रपती कोण होणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. आता त्या परिस्थितीत महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. तर तमिळनाडूचे राज्यपाल रवी किंवा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याही नावाचा या पदासाठी विचार केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


