रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीच्या अकुशल मजुरांच्या हजेरीपत्रकास मंजुरी देण्यासाठी १ हजार ३०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जालना जिल्हा परिषदेतील उपविभागीय जलसंधारण अधिकारी संदीप राऊत यास पकडले.
तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे २०२४ मध्ये जालना पंचायत समितीमार्फत ‘मनरेगा’ योजनेअंतर्गत विहीर मंजूर झाली होती. विहिरीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या अकुशल मजुरांच्या हजेरीपत्रकाला मंजुरी देण्यासाठी आरोपीने लाच मागितल्याची तक्रार आली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जालना जिल्हापरिषद कार्यालयातील आरोपीच्या दालनात सापळा रचला. त्यावेळी कार्यालयातील टेबलाच्या ड्रॉवरमध्ये लाचेची रक्कम ठेवताना पोलीस निरीक्षक कोमल शिंदे यांच्या पथकाने त्याला पकडले.
आरोपीच्या अंगझडतीमध्ये लाचेची रक्कम, एक आयफोन आणि अतिरिक्त १४ हजार ६०० रुपये रोख जप्त करण्यात आले. दुसर्या एका प्रकरणात सेवानिवृत्ताच्या अर्जित रजेच्या फरकाचे देयक काढून देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून जालना मृद व जलसंधारण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक रमेश खरे यास पकडण्यात आले. तक्रारदार हे मृद व जलसंधारण विभाग, जालना येथून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांच्या तीनशे दिवसांचा अर्जित रजेच्या रकमेच्या फरकाचे ३ लाख ४ हजार ६३० रुपये सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंदारण विभाग जालना यांचे कार्यालयात प्रलंबित होते.त्यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कार्यालयात सापळा लावला होता.त्यावेळी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना आरोपीस लाचलुचपत प्रतिंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या पथकाने त्यास पकडले.


