लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरविलेल्या महिला संतप्त ; सरकारला थेट इशारा, जिल्हा परिषद निवडणुकीत जागा दाखवून देणार

लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरविलेल्या लाभार्थी महिला चांगल्याच संतप्त झाल्या आहेत. या लाडक्या बहिणींनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना आपली जागा दाखवून देणार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. लाडकी बहीण योजनेतून मोठ्या प्रमाणात लाडकींची नावे वगळण्यात आल्यानंतर लाडकींचा राज्य सरकारविरोधात संताप बघायला मिळत आहे.

‘गरज सरो आणि वैद्य मरो’, अशा पद्धतीने राज्य सरकारने आमचा वापर केला असल्याचं म्हणत लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या संतप्त लाडकींनी राज्य सरकारमधील सर्वच पक्षांना आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आपली जागा दाखवून देण्याचा थेट इशारा दिला आहे.

सर्व निकषांमध्ये बसत असताना देखील लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले असल्याचा आरोप लाडकींनी केला आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ योजना सुरू झाल्यापासून घेत असलेल्या लाडकींनी या योजनेच्या आणि महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाच्या भरवशावर बचत गटाचे कर्ज देखील घेतले. परंतु आता राज्य सरकारने आपली गरज संपल्यानंतर या योजनेतून बाद केल्यामुळे आता या घेतलेल्या कर्जाचा हप्ता फेडायचा कसा असा प्रश्न योजनेतून वगळण्यात आलेल्या लाडकींसमोर उभा राहिला आहे.

धुणी- भांडी करून मोलमजुरी करणाऱ्या या लाडकींचे आर्थिक गणितच पूर्णतः कोलमडल्यामुळे या लाडकींचा संताप अनावर झाला आहे. याचे उत्तर राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या सर्व पक्षांना आगामी निवडणुकांमधून देणार असल्याचा थेट इशाराच या लाडक्या बहिणींनी दिला आहे.

तर दुसरीकडे, विरोधी पक्षांनी देखील आता अशा लाडकींना हेरण्याचे काम सुरू केलं असून ज्या लाडकी बहीण योजनेच्या जोरावर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आता त्याच नाराज लाडकींचा वापर आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांची खुर्चीला सुरुंग लावण्याचा विरोधक पूर्णपणे प्रयत्न करणार हे निश्चित आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अशा लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या नाराज लाडकींना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण ताकद लावणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी नाराज लाडकींना आश्वासन दिले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles