महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सात जागा लवकरच रिक्त (Rajyasabha Member) होणार.२ एप्रिल रोजी राज्यातून निवडून गेलेले सात राज्यसभा खासदार (Rajyasabha Member) निवृत्त होत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे डॉ. भागवत कराड आणि धैर्यशील पाटील, काँग्रेसच्या रजनी पाटील, उद्धव ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदी आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या फौजिया खान यांचा समावेश आहे. या सर्वांची मुदत संपल्यानंतर तातडीने नव्या निवडणुका होणार आहेत.
२०२० मध्ये या सात जागांसाठी निवडणूक झाली होती, तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. त्या काळात विधानसभेतील संख्याबळाच्या जोरावर महाविकास आघाडीने चार जागा जिंकल्या होत्या. मात्र, सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. सत्तांतरानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आमदारसंख्येचे गणित मोठ्या प्रमाणात ढासळले आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले जाईल का, हा सध्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न ठरत आहे. पवार यांनी ५ नोव्हेंबर २०२४ रोजी दिलेल्या विधानात आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच, दीड वर्षांनी राज्यसभेची मुदत संपल्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असेही त्यांनी सूचित केले होते. त्यामुळे आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत पवार नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीतील सर्वात मोठा घटक पक्ष म्हणून उद्धव ठाकरे गटाचा या एकमेव शक्य असलेल्या जागेवर दावा असणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.


