मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालल्याने मराठा आंदोलकांनी सरकारने यावर तातडीने तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी केली आहे. परिणामी, आज सरकार काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आता याबाबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार का? याबाबत चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री कधीच अडीक नाहीत. पण घटनेच्या काही मर्यादा असतात. मुख्यमंत्र्यांनी उठून शिष्टमंडळाला भेटायला जायचे नसते. शिष्टमंडळाने भेटायला यायचे असते. पण ते इतके फ्लेक्झिबल आहेत की, ते जाऊ सुद्धा शकतील. पण त्यातून प्रश्न सुटला पाहिजे की नुसता अपमान करून घ्यायचा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी 72 टक्के आरक्षण तामिळनाडूमध्ये होऊ शकते. तर घटनेत बदल करता येऊ शकते. घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, असे वक्तव्य केले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे ही सूचना करताय ते अनेक वर्षे सत्तेत होते. दहा वर्षे केंद्र सरकारमध्ये होते. ते पुजनीय आहेत, वंदनीय आहेत. मला जास्त खोलात जायला लाऊ नका, असे प्रत्युत्तर दिले. याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, देवेंद्रजी आणि अजितदादांमध्ये फरक असा आहे की. देवेंद्रजी जे खरं आहे तेही बोलणं टाळतात. आमचे अजितदादा फटकळ आहेत. ते म्हणतात बोलायला लावू नका नाहीतर सगळा इतिहास काढेल. कारण त्यांच्याकडे इतिहास आहे. ते त्यांच्या घरातलेच आहेत. ते त्यांचे पुतणे आहेत.आता त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाले आहे. या आधी प्रत्येक गोष्ट अजितदादांना विचारून केलेली आहे. त्यामुळे अजितदादांना सगळं माहिती आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.