मराठा आरक्षणासाठी मागील तीन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदान इथं मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उपोषण आंदोलन सुरू आहे. राज्यभरातील मराठा समाजबांधव मुंबईत दाखल झालेले असताना जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नेत्यांसह आमदार-खासदारही आझाद मैदानात जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील आझाद मैदानात येण्याची शक्यता वर्तवली असून आज सायंकाळी ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचे समजते.
मराठा आणि कुणबी एकच असल्याने आम्हाला ओबीसी कोट्यातून आरक्षण हवं, अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे. मात्र मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास ओबीसी समाजाची नाराजी ओढावण्याची शक्यता असल्याने सरकारची कोंडी झाली आहे. महाविकास आघाडीतील नेतेही या आरक्षण प्रश्नावरून कोणती भूमिका घ्यावी, याबाबत संभ्रमात आहे. मात्र आता शरद पवार हे थेट मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आझाद मैदान इथं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत अद्याप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अधिकृतरीत्या माहिती देण्यात आलेली नाही.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काल भूमिका मांडली. ‘आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी संसदेत घटनादुरुस्ती करणे हाच उत्तम पर्याय आहे,’ असं ते म्हणाले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात अहिल्यानगर इथं शरद पवार बोलत होते. “राज्यघटनेतील आरक्षणाची मर्यादा आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय यामुळे अनेक राज्यांमध्ये आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. आरक्षणाची मर्यादा 50 ते 52 टक्के असली, तरी तामिळनाडू सरकारने 72 टक्के आरक्षण दिले आहे. त्यांनी ते न्यायालयातही टिकवलंही आहे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संसदेत घटनादुरुस्ती करणं आवश्यक आहे,” असं मत पवार यांनी व्यक्त केलं आहे.


