अहिल्यानगर : भाजपचे आमदार, ज्येष्ठ नेते शिवाजी भानुदास कर्डीले (वय ६६) यांचे ह्रदयविकाराने निधन. आज पहाटे त्यांना त्रास होऊ लागल्याने अहिल्यानगर येथील साईदीप साह्यद्री रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे सांगितले.
भाजपचे आमदार, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे निधन…
नगर राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे अल्प आजाराने निधन झाले. आ.कर्डिले यांनी वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी करीत मोठा विजय मिळवला होता. बुर्हाणनगर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कर्डिले यांनी तरुण वयातच नेतृत्व गुण सिद्ध करून अपक्ष उमेदवारी करीत नगर तालुक्यातून आमदारकी मिळवली होती. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप असा प्रवास करीत ते पाच वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले. नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते विद्यमान अध्यक्ष होते.नगर जिल्ह्यातील प्रस्थापितांच्या राजकारणात कर्डिले यांनी स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत ठसा उमटवला होता. नगर तालुक्यासह शेजारील तालुक्यात त्यांचा मोठा वरचष्मा होता.


