PM मोदी बारामतीत येणार, शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती; कारण आले समोर…

समाजाला दिशा देणाऱ्या महापुरुषांचे विचार, कार्य आणि प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात एक विशेष प्रेरणास्थान उभारण्यात येत आहे. गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यासह विविध समाजसुधारक आणि राष्ट्रनिर्मात्यांच्या कार्याचे दर्शन घडवणारी ही वास्तू विद्या प्रतिष्ठानच्या स्थापना दिनानिमित्त १६ ऑक्टोबर रोजी उद्घाटनासाठी सज्ज होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहावेत, असा विचार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारण्यात येणाऱ्या या प्रेरणास्थानामध्ये समाजाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अनेक महापुरुषांची चित्रे आणि त्यांच्या कार्याची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी नामवंत कलाकारांकडून महापुरुषांची आकर्षक चित्रे तयार करण्यात आली आहेत. या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराजा सयाजीराव गायकवाड, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, यशवंतराव चव्हाण आणि शारदाबाई पवार यांना प्रेरणास्थान म्हणून स्थान दिले जाणार आहे.

शरद पवार यांनी सांगितले की, या वास्तूचा उद्देश केवळ महापुरुषांची छायाचित्रे प्रदर्शित करणे नसून त्यांच्या विचारांचा, सामाजिक कार्याचा आणि ऐतिहासिक योगदानाचा परिचय विद्यार्थ्यांना व नागरिकांना करून देणे हा आहे. प्रत्येक महापुरुषाच्या जीवनकार्याची माहितीही येथे उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून हे केंद्र अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल.

यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचाही विशेष उल्लेख केला. त्यांनी देशभर विहिरी, बारव आणि पाणवठे उभारून जनतेसाठी पाणी उपलब्ध करून दिल्याची आठवण करून देत, जिरायती आणि पाणीटंचाईग्रस्त भागात त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन बारव उभारण्याची संकल्पना राबविण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. जलसंधारणाच्या पारंपरिक पद्धतींना प्रोत्साहन देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.दरम्यान, महिला कार्यकर्त्यांना अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती वाचनासाठी देण्यात आली असता त्यामध्ये झालेली एक तथ्यात्मक चूक आपल्या निदर्शनास आल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. महापुरुषांच्या कार्याचा उल्लेख करताना संदर्भ, इतिहास आणि माहितीची अचूकता राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इतिहासाचे सादरीकरण जबाबदारीने झाले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

विद्या प्रतिष्ठानच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात या प्रेरणास्थानाचे उद्घाटन करण्याचा विचार असून, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीबाबत अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. अधिकृत कार्यक्रमाबाबत अंतिम निर्णय संबंधित स्तरावर होणार असला तरी, महापुरुषांचे विचार आणि समाजासाठीचे त्यांचे योगदान पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles