लेखी आश्वासनानंतर खासदार नीलेश लंके यांचे उपोषण मागे
शिक्षक पदभरती, अशैक्षणिक कामांचा भार व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीबाबत प्रशासनाची कार्यवाही
शासनाकडे प्रस्ताव सादर
अहिल्यानगर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरणे, शिक्षकांवरील वाढता अशैक्षणिक कामांचा भार कमी करणे आणि विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबविणे या मागण्यांसाठी खासदार नीलेश लंके यांनी सुरू केलेले उपोषण मंगळवारी उशिरा मागे घेतले. माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर तसेच शासनस्तरावरील मागण्यांबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
खासदार लंके यांनी १ सप्टेंबरपासून अहिल्यानगर जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. जिल्ह्यात शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असून त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचा मुद्दा त्यांनी आंदोलनातून उपस्थित केला होता. तसेच कार्यरत शिक्षकांवर विविध अशैक्षणिक कामांचा वाढता भार टाकला जात असल्याने अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याची भूमिका त्यांनी मांडली होती.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमिक शाखेने दिलेल्या लेखी माहितीनुसार, जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील रिक्त शिक्षक पदांची भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलमार्फत सुरू आहे. सन २०२६ मधील भरती प्रक्रियेत जिल्ह्यातील १५१ संस्थांच्या एकूण ९६३ पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
पहिल्या टप्प्यात विनामुलाखत प्रक्रियेद्वारे १४ संस्थांमधील ३३१ रिक्त पदांसाठी २७० उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. उर्वरित ६१२ पदांसाठी मुलाखतीसह निवड प्रक्रिया पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील सुमारे १९४ संस्थांनी अद्याप पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध केलेल्या नाहीत. तसेच ३० अल्पसंख्याक संस्थांमधील रिक्त पदे व भरती प्रक्रियेबाबत आढावा घेऊन पुढील नियमोचित कार्यवाही करण्यात येणार आहे. नियमित शिक्षकांच्या जागी अन्य शिक्षकांकडून अध्यापन करून घेतले जात आहे का, याचीही क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी करण्यात येणार असून आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाने कळविले आहे.
शिक्षकांचा प्रत्यक्ष अध्यापनासाठीचा वेळ आणि अशैक्षणिक कामांमध्ये जाणारा वेळ याचा आढावा घेण्यात येणार आहे. त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणाऱ्या परिणामाचाही अभ्यास करण्यात येणार असून स्तंभालेखासह सविस्तर माहिती पुढील आठ दिवसांत खासदार लंके यांना देण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले आहे. प्राथमिक शिक्षण विभागानेही खासदार लंके यांच्या निवेदनातील जिल्हा परिषद स्तरावरील मागण्यांवर कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच शाळानिहाय गुणवत्ताविषयक स्तंभालेख आठ दिवसांत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
खासदार लंके यांच्या उपोषणातील शासनस्तरावरील प्रमुख मागण्यांबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत एफएसएसएआय नोंदणी मुख्याध्यापकांच्या नावाने न करता अन्न शिजविणाऱ्या यंत्रणा अथवा स्वयंपाकी यांच्या नावाने करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पोषण आहार शिजविणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करून ते किमान ७ हजार ५०० रुपयांपेक्षा अधिक करण्यात यावे, तसेच काम केलेल्या संपूर्ण कालावधीचे मानधन देण्यात यावे, अशीही मागणी प्रस्तावात करण्यात आली आहे.
आधार कार्डाअभावी विद्यार्थ्यांच्या प्रवेशात अडचणी येत असल्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणीही शासनाकडे करण्यात आली आहे. शिक्षकांना अध्यापनाशी थेट संबंध नसलेल्या अशैक्षणिक कामांपासून मुक्त करून त्यांचा जास्तीत जास्त वेळ अध्यापनासाठी उपलब्ध करून द्यावा, हा खासदार लंके यांच्या आंदोलनातील महत्त्वाचा मुद्दा शासनाकडे पाठविण्यात आला आहे. अत्यावश्यक शासकीय कामांसाठी शिक्षकांची नियुक्ती करावी लागल्यास विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होणार नाही, अशी पर्यायी प्रशासकीय व्यवस्था निर्माण करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आणि मागण्या शासनस्तरावर पाठविण्यात आल्याने खासदार नीलेश लंके यांनी मंगळवारी उशिरा उपोषण मागे घेतले. मात्र, शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न सुटेपर्यंत आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक उपाययोजना होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याची भूमिका त्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
उपोषण स्थळी दादाभाऊ कळमकर, जिल्हाध्यक्ष सिताराम काकडे , रामेश्वर निमसे, रामभाऊ झिने, सुशील बोर्डे, अभिजीत ससाने,प्रकाश पोटे,रघुनाथ झिने बाळासाहेब हराळ, बन्सी उबाळे, पोपटराव पुंड, नगरसेवक योगीराज गाडे, महादेवराव कोकाटे, शरद पवार, शिवा पाटील होळकर, शाम जरे, दिलीप वाळुंज अनिल जगताप आदी उपस्थित होते.जिल्हा परिषद चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री राहुल शेळके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, माध्यमिकचे जिल्हा उपशिक्षणाधिकारी श्रीमती संध्या भोर, प्राथमिकच्या जिल्हा उपशिक्षणाधिकारी श्रीमती शिवगुंडे, शालेय पोषण आहारचे लेखाधिकारी, व इतर शिक्षण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.


