मुंबई : अहिल्यानगर महानगरपालिकेत वारंवार भ्रष्टाचार सुरू आहे. त्या संदर्भात आमचे शहर प्रमुख किरण काळे यांनी मुख्यमंत्री, अँटी करप्शनकडे, जिल्ह्यातील या संदर्भातील संबंधित अधिकाऱ्यांकडे मागील दोन वर्षांपासून तक्रार, पाठपुरावा करत आहेत. अहिल्यानगर मध्ये रस्ते जागेवर नाहीत. रस्ते शोधावे लागतात. नागरी सुविधा नाहीत. रस्त्यांच्या या कामामुळे जनतेचे पावसाळ्यात प्रचंड हाल सुरू आहेत. प्रशासक, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगनमतातून अहिल्यानगरची महानगरपालिका हे या महाराष्ट्रातील दरोडेखोरीच एक उत्तम नमुना आहे. त्याची चौकशी व्हावी यासाठी काळे यांनी निवेदनं दिली, तक्रारी केल्या. तरी देखील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई होत नाही. म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुराव्यांसह या स्कॅमची फाईल पाठवली आहे. जर मुख्यमंत्री अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर कारवाया करत नसतील तर शिवसेना त्यांना सोडणार नाही. त्यांची जागा तुरुंगातच आहे.
या स्कॅम संदर्भात काळे यांनी मंगळवारी मुंबईत खा. राऊत यांची समक्ष भेट घेत या संदर्भातील पुराव्यांची फाईल त्यांना दिली होती. त्यानंतर राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित ती फाईलच सरकारला दिली आहे. मुंबईत बुधवारी सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची व आमदारांच्या राडेबाजीची रोज नवीन प्रकरणे समोर येत आहेत. भ्रष्टाचाराच्या संदर्भात महाराष्ट्रात एक प्रकारची अनागोंदी माजली असून महापालिकेतील प्रशासक व अधिकारी संगणमताने शासकीय तिजोरीची लूट करीत आहेत. अहिल्यानगर महानगरपालिकेतील प्रकरण धक्कादायक आहे. कटकारस्थान रचून अहिल्यानगर शहरातील सन २०१६ ते २०२० या चार वर्षांच्या कालावधीत ७७६ रस्त्यांच्या सुमारे रु. ३५० ते ४०० कोटींहून अधिक रकमेचा महाघोटाळा करत भ्रष्टाचार केला आहे. हा अहिल्यानगर मधील आज वरचा सर्वात मोठा स्कॅम असून संबंधित लोक हे सरकारला समर्थन देत असल्यामुळे हा स्कॅम दडपला जात आहे.
हा घोटाळा अहिल्यानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी पुराव्यानिशी उघड केला आहे. तुमचे महायुतीचे सरकार राज्यात सत्तेत असताना दि. ८ मे २०२३ रोजी त्यांनी पहिली तक्रार अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आयुक्तांसह मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, तसेच आपल्याच सरकारमधील महसूल मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांनी आजवर नगर विकास विभाग, गृह विभाग तसेच या मनपाला कामांची बिले अदा करण्यात पूर्वी आवश्यक असणारे दिले जाणारे गुणवत्तांचे प्रमाणपत्र ज्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत असणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतन, अहिल्यानगर या संस्थेच्या वतीने दिले जाते त्यांच्याकडे वारंवार लेखी पाठपुरावा केला.
राऊतांनी पत्रात पुढे म्हटले आहे, काळे यांच्या तक्रारीवरून आणि केलेल्या आंदोलनानंतर शासकीय तंत्रनिकेतन, अहिल्यानगर यांनी दि. १६/०६/२०२३ रोजी पाच सदस्य समिती गठीत केली. या समितीने सर्व उपलब्ध कागदपत्र, पुरावे यांची सखोल पडताळणी केली असता सुमारे ७७६ रस्त्यांच्या कामांची शेकडो कोटींची बिले लाटण्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, मनपा सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहर अभियंता, इतर अभियंते, या विभागातील कर्मचारी, आपल्या महायुतीच्या आमदारांचे कार्यकर्ते असणारे शेकडो ठेकेदार यांनी राजकीय वरदहस्थातून संगणमत करून कटकारस्थान करून शासकीय तंत्रनिकेतन, अहिल्यानगरच्या काही भ्रष्ट लोकांना हाताशी धरून शासनाची संस्था असणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतनच्या नावाने बनावट लेटरहेड, बनावट शिक्के, राजपत्रित असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नावांचे बनावट शिक्के, त्यांचा खोट्या सह्या करून हा महाघोटाळा केला आहे.
या घोटाळ्यामध्ये महायुतीच्या विद्यमान आमदारांसह आज आपल्याला समर्थन देणाऱ्या शिंदे गटात असणाऱ्या तत्कालीन महापौर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने झालेले भारतीय जनता पार्टीचे महापौर, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे. या महाघोटाळ्याचा मलिदा हा तुमच्या महायुती सरकारच्या भ्रष्ट नेते, पदाधिकारी यांनी संगनमत करत लाटला आहे.
अहिल्यानगर शहराचे नागरिक रस्त्यांच्या समस्येमुळे मेटाकुटीला आले आहेत. सरकार त्यांना रस्ते ही देऊ शकत नसेल तर अशा सत्तेचा काय उपयोग. गुन्ह्याची व्याप्ती पाहता या प्रकरणातील आरोपींची संख्या ही प्रचंड मोठी आहे. जनतेची लूट करणाऱ्या आपल्या सरकारच्या वरदहस्ताने अशा साखळी पद्धतीने भ्रष्टाचार करणाऱ्या भ्रष्टाचारांची जागा ही तुरुंगात असायला हवी, असे राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.


