पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर जनतेला काटकसरीचे आवाहन केले. इंधनाचा वापर कमीत कमी करताना परदेश प्रवास टाळण्याचा सल्ला मोदींनी दिला आहे. याचदरम्यान पंतप्रधान स्वतः परदेश दौऱ्यावर गेल्याने त्यांच्या वर टीका होत आहे. मात्र आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात ही गोष्ट आपल्याला विसरुन चालणार नाही. जिथे देशाची प्रतिष्ठा असते तिथं राजकीय आरोप करायचे नसतात असं मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केलं. पुण्यातील लक्ष्मणराव गुट्टे रूरल डेव्हल्पमेंट फाऊंडेशन आयोजित युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींच्या कामाचं कौतुक केलं.
पवार म्हणाले की, “नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. काही राजकीय विचारांच्या संबंधी माझी आणि त्यांची भूमिका वेगळी असू शकते. पण आज भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात ही गोष्ट आपल्याला विसरुन चालणार नाही. जिथे देशाची प्रतिष्ठा येते तिथे राजकीय आरोप करायचे नसतात.”
मुंबईतील मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला एकेकाळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व केलेले मंत्री उदय सामंत, मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री जयकुमार रावल, रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार संजय पाटील, धैर्यशील माने, नरेंद्र भोडेकर, अतुल भोसले असे अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.


