Sunday, February 22, 2026

नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर महामार्गास मंजुरी ;खासदार नीलेश लंके यांची माहिती

नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर महामार्गास मंजुरी

अहिल्यानगरच्या विकासाला नवी दिशा देणारा महामार्ग

खासदार नीलेश लंके यांची माहिती

अहिल्यानगर : प्रतिनिधी

केंद्रीय मंत्रिमंडळाने नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर–अक्कलकोट या ६ पदरी, प्रवेश-नियंत्रित (ॲक्सेस कंट्रोल्ड) ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्पास मंजुरी दिली असून, हा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याचा समावेश राष्ट्रीय दर्जाच्या द्रुतगती महामार्ग जाळ्यात होणार असून, दळणवळणाच्या दृष्टीने अहिल्यानगरला नवे महत्त्व प्राप्त होणार असल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली.

या महामार्गाची एकूण लांबी सुमारे ३७४ किलोमीटर असून, सुमारे १९ हजार १४२ कोटींची गुंतवणूक या प्रकल्पासाठी करण्यात येणार आहे. ‘पीएम गतीशक्ती’ राष्ट्रीय मास्टर प्लॅनअंतर्गत विकसित होणारा हा महामार्ग पश्चिम किनारपट्टीपासून दक्षिण भारतापर्यंतचा एक महत्त्वाचा दळणवळण दुवा ठरणार आहे. परिणामी राज्यातील आणि देशातील प्रमुख आर्थिक केंद्रांशी अहिल्यानगरचा संपर्क अधिक वेगवान व सुलभ होणार आहे.

महामार्गामुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे ४५ टक्के घट होण्याची शक्यता असून, त्याचा थेट लाभ व्यापार, शेती आणि उद्योग क्षेत्राला मिळणार आहे. शेतमाल, दुग्धव्यवसाय तसेच कृषीपूरक उद्योगांच्या वाहतुकीवरील खर्चात लक्षणीय बचत होणार असून, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) लॉजिस्टिक्स अधिक सक्षम होणार आहे. यासोबतच औद्योगिक, गोदाम, प्रक्रिया उद्योग आणि सेवा क्षेत्रात नव्या गुंतवणुकीस चालना मिळणार असल्याचे अपेक्षित आहे.

या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांसाठी थेट व अप्रत्यक्ष स्वरूपात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. सुधारित दळणवळण व्यवस्था आणि वाढणारी औद्योगिक गुंतवणूक यामुळे जिल्ह्याचा आर्थिक पाया अधिक भक्कम होणार असून, अहिल्यानगर केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे तर आर्थिक व औद्योगिकदृष्ट्याही केंद्रस्थानी येणार आहे.

या निर्णयाचे स्वागत करताना खासदार निलेश लंके यांनी सांगितले की, अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा महामार्ग अत्यंत निर्णायक ठरणार आहे. दळणवळण, व्यापार, शेती, उद्योग आणि रोजगार या सर्वच क्षेत्रांना या प्रकल्पामुळे नवी दिशा मिळेल. केंद्र सरकारने अहिल्यानगरच्या विकास क्षमतेवर दाखवलेला विश्वास महत्त्वाचा असून, या महामार्गाचा जिल्ह्याला जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी केंद्र व राज्य पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

नाशिक–अहिल्यानगर–सोलापूर ६ पदरी महामार्ग हा अहिल्यानगरच्या भविष्यकालीन विकासाचा कणा ठरणार असून, जिल्ह्याला विकासाच्या नव्या युगात नेणारा हा ऐतिहासिक निर्णय असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles