अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोलेचे आमदार किरण लहामटे यांचे चुलत भाऊ आणि स्वीय सहाय्यक मुकुंद लहामटे यांनी राजूर बाजारपेठेत एका तरुणाला भररस्त्यात फिल्मीस्टाईल बेदम मारहाण केल्याची घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार, अकोले तालुक्यातील राजूर बाजारपेठेत मुकुंद लहामटे यांनी एका तरुणाला रस्त्यात अडवले. एका किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. मुकुंद लहामटे यांनी काही विचार न करता या तरुणाला भरबाजारपेठेत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आमदाराच्या भावानेच कायदा हातात घेऊन सामान्य तरुणाला फिल्मीस्टाईलने मारहाण केल्याने राजूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मारहाणीची ही संपूर्ण घटना एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे. ६ जुलैची ही घटना असली तरी याचा व्हिडिओ आता समोर आल्याने तालुक्यात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. सत्ताधारी आमदाराच्या नातेवाईकाकडून झालेल्या या गुंडगिरीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकच खळबळ उडाली आहे.


