Saturday, November 1, 2025

पाकिस्तानची घाबरगुंडी ऑपरेशन सिंदूर सुरूच; पाकिस्तानमधील आणखी १२ ठिकाणं टार्गेटवर

कंगाल पाकिस्तानला हादरा देणारं भारताचं ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत या मोहिमेची पूर्ण माहिती उपस्थित सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना दिली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. भारताच्या एअर स्ट्राइकनं बिथरलेल्या पाकिस्ताननं हल्ला केला, तर भारत सरकार आणि लष्कर मागे हटणार नाही, असं सूत्रांकडून सांगण्यात आलं.

केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीत मोठं वक्तव्य केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नाही. भारताच्या हवाई हल्ल्यात किमान १०० दहशतवादी मारले गेले आहेत, अशी माहिती सिंह यांनी दिली. सर्वपक्षीय बैठकीनंतर रिजिजू यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

भारतीय लष्कराच्या हवाई हल्ल्यात पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले. रिपोर्ट्सनुसार, दहशतवाद्यांचे आणखी १२ कॅम्प आहेत. त्यांची यादी तयार करण्यात आली आहे.

रिजिजू यांनी सांगितले की, राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. हा मुद्दा गंभीर होता. सर्वांचा पाठिंबा मिळाला. या बैठकीत संरक्षण मंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरची सगळी माहिती दिली. सरकारच्या मनात नेमकं आता काय चाललंय, याबाबतची माहिती विरोधी पक्षांच्या नेत्यांना देण्यात आली. विरोधकांनीही पाठिंबा दिला असून, या मुद्द्यावर राजकारणाला थारा नाही, असे सूचित केले. हे ऑपरेशन अद्याप सुरू असल्याने याबाबत अधिक माहिती दिली जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

भारतानं ऑपरेशन सिंदूर फत्ते केलं. भारतीय लष्कर, हवाई दल, नौदलानं अचूक लक्ष्यभेद केला. पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ नेस्तनाबूत केले. या हवाई हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा केला जात आहे. आता पाकिस्तानच्या आणखी १२ दहशतवादी तळांची यादी तयार केली आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पीओकेपासून ते पाकिस्तानमधील दहशतवादाचं मूळच नष्ट करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानची घाबरगुंडी

भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळं पाकिस्तान बिथरला आहे. अख्ख्या पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. ज्या दहशतवादाला पोसलं, तोच दहशतवाद पाकिस्तानच्या मुळावर उठल्याचं आजच्या घटनेनंही समोर आलं आहे. लाहोरमध्ये सकाळी सकाळी झालेल्या साखळी स्फोटांनी पाकिस्तानचा बुरखा आणखी फाटला आहे. भारतानं फक्त दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. नऊ दहशतवादी तळांच्या चिंधड्या उडवल्या आहेत. आता पाकिस्तानमधील आणखी १२ दहशतवादी तळ निशाण्यावर असून, कोणत्याही क्षणी त्यांच्यावर हल्ले होऊ शकतात, असेच संकेत मिळत आहेत.

भारताच्या सीमाभागात हवाई संरक्षण यंत्रणा अलर्टवर आहे. भारताच्या हवाई हल्ल्याने पाकिस्तान बिथरला आहे. त्यांनी प्रत्यक्ष ताबारेषेवर गोळीबार सुरू केला आहे. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरूच आहे. त्यामुळं भारतीय लष्कराने काश्मीरच्या १० जिल्ह्यांमध्ये नियंत्रण कक्ष उभारले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles