पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पुढील वर्षभर अनावश्यक सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यावर समाजमाध्यमांवर विनोद, मीम्स आणि उपरोधिक पोस्टचा अक्षरशः पूर आला आहे. महागाई, लग्नसराई, अधिक मास, जावई-सासरचे नाते आणि सराफा बाजार या सगळ्यांचा संगम साधत नेटिझन्सनी भन्नाट कल्पकता दाखवली असून फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स आणि व्हॉट्सअॅपवर हे मीम्स मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत.
अधिक मास जवळ येत असतानाच हा विषय चर्चेत आल्याने मराठी समाजमाध्यमांवर ‘जावई विरुद्ध सासर’ अशा स्वरूपातील विनोद सर्वाधिक शेअर होत आहेत. त्यातील एक विनोद विशेष चर्चेत आला आहे. ‘ब्रेकिंग न्यूज : ऐन जवळ येऊन ठेपलेल्या अधिक मासातच (धोंड्याचा महिना) देशाच्या पंतप्रधानांनी सोने खरेदी न करण्याचे आवाहन केल्यामुळे जावई लोकांमध्ये तीव्र नाराजी तसेच सासुरवाडीत उत्साहाचे वातावरण…’ हा संदेश अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये फिरताना दिसत असून त्यावर ‘सासऱ्यांना मोठा दिलासा’, ‘यंदा जावयांना फक्त नारळावर समाधान मानावे लागणार’, ‘सराफा बाजारात शोककळा’ अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
एका लोकप्रिय मीममध्ये पत्नी नवऱ्याला विचारताना दाखवली आहे. ‘देश वाचवायचा की दागिने घ्यायचे?’ तर दुसऱ्या पोस्टमध्ये, ‘इथे विष खायला पैसे उरले नाहीत, आणि मोदी म्हणतात सोने घेऊ नका!’ असा टोला मारण्यात आला आहे.सराफा व्यापाऱ्यांवर आधारित मीममध्ये सोनार हात जोडून म्हणताना दाखवला आहे. ‘वर्क फ्रॉम होम आम्हालाही लागू करा!’ तर दुसऱ्या पोस्टमध्ये, ‘सराफा बाजारात शोकसभा; सासऱ्यांनी फटाके फोडले!’ असा उपरोधिक उल्लेख करण्यात आला आहे. काही नेटिझन्सनी या चर्चेला अधिक मासाशी जोडत ‘धोंड्याच्या महिन्यात जावयांची आर्थिक सुटका झाली’, तर काहींनी “यंदा सासरकडून सोन्याऐवजी शुभेच्छापत्र मिळणार’ असे विनोद केले आहेत.
या विषयावर इंस्टाग्राम रील्स, फेसबुक पोस्ट आणि युट्यूब शॉर्ट्स मोठ्या प्रमाणात तयार करण्यात येत आहेत. अनेक मराठी विनोदी पेजेसनी ‘जावई’, ‘सासर’, ‘सोने’ आणि ‘अधिक मास’ या विषयांवर स्वतंत्र मीम सिरीज सुरू केल्या आहेत. काही व्हिडिओंमध्ये लग्नातील पारंपरिक सोने खरेदीची दृश्ये दाखवत त्यावर विनोदी संवाद टाकण्यात आले आहेत. समाजमाध्यमांवरील चर्चेमुळे ‘सोने खरेदी’, ‘अधिक मास’, ‘जावई’, ‘सराफा बाजार’ हे शब्द ट्रेंड होताना दिसत आहेत. अनेकांनी या विषयाकडे हलक्याफुलक्या नजरेने पाहत विनोदांचा आनंद घेतला असला, तरी काहींनी सोने खरेदी आणि भारतीय कुटुंबव्यवस्थेतील भावनिक नातेसंबंध यावरही भाष्य केले आहे.
‘जावयांमध्ये नाराजी, सासुरवाडीत जल्लोष’.. ‘सोने खरेदी टाळा’ चर्चेचा समाजमाध्यमांमध्ये पाऊस
- Advertisement -


