अपहृत तरुणाची सुटका करायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला, कर्मचारी गंभीर: 5 आरोपी ताब्यात
अहिल्यानगर, 23 मे 2026: नगर तालुका परिसरात अपहरण झालेल्या तरुणाची सुटका करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर संशयित आरोपींनी अचानक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी विक्रांत भालसिंग गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन विजय कार्ले, रा. दहिगाव साकत, यांनी शुक्रवारी, 22 मे रोजी सकाळी 11 वाजता नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन भावाचे अपहरण झाल्याची माहिती दिली. त्यांचा भाऊ आकाश विजय कार्ले, वय 27, याचे गुरुवारी, 21 मे रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात इसमांनी राहत्या घरातून जबरदस्तीने स्कॉर्पिओ गाडीत डांबून अपहरण केले होते.
अपहरणकर्ते आकाशच्या मोबाईलवरून वारंवार फोन करून कुटुंबियांकडे 90 हजार रुपयांची खंडणी मागत होते. पैसे न दिल्यास आकाशचा खून करण्याची धमकीही आरोपी देत होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. अपहृत तरुणाच्या मोबाईलचे लोकेशन कोल्हुबाईचे कोल्हार परिसरात आढळून आले.
त्यानंतर नगर तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी खंडेराव शिंदे, विक्रांत भालसिंग व दोन होमगार्ड यांचे विशेष पथक तयार करून अपहृत तरुणाच्या भावासह व मित्रांसोबत तातडीने कोल्हार येथे रवाना करण्यात आले.
कोल्हार येथील दोस्ती नावाच्या हॉटेलमध्ये कैद करून ठेवलेल्या आकाश कार्ले याची सुटका करण्याचा प्रयत्न करत असताना अपहरणकर्त्यांनी पोलिसांवर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी विक्रांत भालसिंग यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर खंडेराव शिंदे किरकोळ जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत एमआयडीसी पोलीस, आरसीपी पथक आणि नगर तालुका पोलिसांच्या संयुक्त मदतीने विशेष कारवाई राबवली. या कारवाईत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.
जखमी भालसिंग यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


