आरोळे वस्ती येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी वसतिगृहात रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. या वसतिगृहातीलच विद्यार्थ्यांमध्ये मारहाण होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुरूवार (दि.24) रोजी समाज कल्याण उपायुक्त प्रविण कोरगंटीवार यांनी जामखेडला भेट देत चार अधिकार्यांची समिती नेमली. तसेच मारहाण करणार्या तीन विद्यार्थ्यांना शाळेतून घराचा रस्ता दाखवण्यात आल्याची माहिती कोरगंटीवार यांनी दिली आहे. दरम्यान, तालुक्यात भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी जामखेड तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती नेमण्यात आली आहे.
शहरातील आरोळे वस्ती येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांचे शासकीय निवासी आहे. या वसतीगृहात 9 वी च्या विद्यार्थ्यांकडून 8 वीच्या विद्यार्थींना बेदम मारहाण करण्यात आली असल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर संबंधीत घटनेची दखल घेत जिल्हास्तरावर चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समिती मार्फत चौकशी करण्यासाठी पथक वसतीगृहात गुरूवारी दखल झाले. समाज कल्याण विभागाचे सहायक उपायुक्त कोंरगटिवार यांनी जामखेडच्या वसतीगृहाला भेट दिली.
या प्रकरणी जिल्हास्तरीय चार अधिकार्यांची समिती नेमण्यात आली आहे. या प्रकरणात रॅगिंग करत मारहाण करणार्या तीन विद्यार्थींना शाळेतून काढुन टाकण्यात आले आहे. तसेच आशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती नेमण्यात आली आहे. या प्रकरणी संदर्भातील अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येणार असल्याचे कोरगंटीवार यांनी सांगितले. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अतिश पारवे निवेदन देत जबाबदार कर्मचारी अशा प्रकारणाकडे गांभिर्याने पाहत नाहीत. त्यामुळे त्यांची चौकशी होवून ते निलंबित व्हावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, वसतिगृहातील रॅगिंग आणि मारहाण यापूर्वीच झालेली आहे. मात्र, बुधवारी वसतिगृहाला सुट्ट्या लागल्या. त्यानंतर विद्यार्थी आपल्या घरी गेल्यानंतर या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मारहाण करणारे आणि मारहाण झालेले विद्यार्थी हे जामखेड तालुक्यातील आहेत.


