राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत महायुती भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांचा प्रचार वेगात येत असतानाच, निवडणूक न लढविणारे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलेल्या विधानाने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
‘मी अजून महाविकास आघाडी सोडलेली नाही. मी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही’, असे म्हणत प्राजक्त तनपुरेंनी राजकीय बाॅम्ब टाकून दिला आहे.
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी समाज माध्यमावर दिलेल्या एका मुलाखतीत, मी अजून महाविकास आघाडी सोडलेली नाही, असे विधान केले आहे. तनपुरे यांच्या विधानाने महायुती भाजपमध्ये राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अस्वस्थता पसरली आहे. तनपुरे यांच्या या विधानाचा राहुरीतून भाजपला मिळणाऱ्या मतदानावर परिणाम होईल, असे निरीक्षण भाजपमधील ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते हे वरिष्ठांकडे नोंदवत आहेत. त्यामुळे तनपुरे यांच्या विधानाला महत्त्व आलं आहे.
प्राजक्त तनपुरे म्हणाले, “मी काय महाविकास आघाडी सोडलेली नाही. मी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. 2029 च्या रणसंग्रामात मी पूर्ण ताकदीने असणारच आहे. मी एकटा निवडून येण्याने काही फरक पडणार नाही. परंतु सरकारमध्ये जे लोक आहेत, त्यांनी माझे प्रश्न सोडवण्याचा आश्वासन दिलं असेल, तर यात कुठे महाविकास आघाडी कमकुवत होते.”
“आता निवडणुका होऊन दीड वर्ष झालेले आहेत, अजून साडेतीन वर्ष जायचे आहेत. पुढे 2029 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार यावं, यासाठी आम्ही रणसंग्रामात असणार आहोत. आता जे उमेदवार आहेत, त्यांच्या वडिलांचं निधन झालेलं आहे, ते आता उमेदवारी करत आहेत. परंतु या ठिकाणी महाविकास आघाडी कुठेही कमकुवत असल्याचं दिसत नाही. निवडणुकीत होईल काय ताकद लावायचे आहे ती आम्ही लावू,” असे प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं.
प्राजक्त तनपुरे यांनी कितीही ताकद लावली असती, तरी ते अक्षय कर्डिलेंविरुद्ध पराभूत झाले असते, असे काही भाजपच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. यावर बोलताना तनपुरे म्हणाले, “हा त्यांचा बालिशपणा आहे. मी जेव्हा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस मला भाजपमधून काही लोकांचे आभार मानण्यासाठी फोन आले. प्रत्येक पक्षांमध्ये काही चिल्लर लोकं असतात. मनाचा मोठेपणा दाखवणारे लोक असतात, समंजसपणा दाखवणारे देखील लोक असतात, आपण कोणत्या दृष्टिकोनातून निर्णय घेतला आहे, हे आपल्यालाच माहिती आहे. माझी ताकद काय हे मला अन् माझ्या मागे उभे असलेल्या जनतेचा माहिती.”


