संगमनेर-तालुक्यातील जोर्वे येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी (दि.1) माहितीच्या मागणीवरून ग्रामविकास अधिकारी यांच्यावर एकाने हल्ला केला. या घटनेत अधिकार्याची गच्ची धरून शिवीगाळ, धमकी व मारहाण करण्यात आली. याचबरोबर सरकारी कामकाजात अडथळा आणत कार्यालयातील प्रोसिडिंग रजिस्टरची पाने फाडून नुकसान करण्यात आले. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरुन, सोमवारी सकाळी ग्रामविकास अधिकारी बाजीराव केशय पवार (वय 54, रा. लोणी बु., ता.राहाता) हे नेहमीप्रमाणे कार्यालयीन कामकाज करीत होते. दुपारी सव्वा एका वाजता संगणक ऑपरेटर शिरीष इंगळे यांच्याकडे काम सुरू असताना अचानक राजेंद्र श्रीपत थोरात (रा. जोर्वे) हा कार्यालयात आला. त्याने पवार यांना दिलेल्या माहितीमध्ये अपूर्णता असल्याची तक्रार करत तत्काळ रेकॉर्ड दाखविण्याची मागणी केली. पवार यांनी सध्या मी मीटिंगचा अहवाल तयार करत असून तुम्ही अर्ज करून उद्या माहिती घ्या असे सांगितल्याने थोरात संतापून कार्यालयातून निघून गेला. दुपारी अडीचच्या सुमारास थोरात पुन्हा कार्यालयात आला व लगेचच रेकॉर्ड पाहण्याचा हट्ट धरला.
पवार यांनी पुन्हा अर्ज करून माहिती देण्याची प्रक्रिया समजावली. पण त्यावर तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नसून त्याने प्रोसिडिंग रजिस्टर उचलून झेरॉक्स काढून आणण्याची मागणी केली. पवार यांनी नियमावलीनुसार माहिती देण्याची तयारी दर्शवली. मात्र, थोरातने रागाच्या भरात रजिस्टरची पाने फाडली. घटनेत थोरातने पवार यांना गच्ची धरून ‘तू खूप माजला आहेस, तुला पाहून घेतो. आमच्या गावात काम करुन आमचं ऐकत नाहीस? कुणाच्या जिवावर उड्या मारतोस?’ अशा दमबाजीच्या शब्दांत शिवीगाळ करत धमकावले. यावेळी त्याने डाव्या कानावर चापट मारून शर्टचे बटण तोडले. त्यामुळे अधिकार्याला शारीरिक त्रासाबरोबरच मानसिक धक्काही बसला.
या प्रकारामुळे ग्रामविकास अधिकारी यांचे चालू कामकाज विस्कळीत झाले असून शासकीय रेकॉर्डचे नुकसान झाले. सरकारी सेवकाला मारहाण, धमकी देणे व कार्यालयीन कामात अडथळा आणणे हा गंभीर गुन्हा असून ग्रामविकास अधिकारी बाजीराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राजेंद्र थोरात याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.


