पंचायत समितीमधील अधिकार्‍यास बेदम मारहाण ; दहा जणांवर गुन्हा दाखल

संगमनेर तालुका पंचायत समिती कार्यालयातील तालुका अभियान व्यवस्थापकास सोमवारी (दि.23) दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास महिला बचत गटातील समुदाय संसाधन व्यक्ती (सीआरपी) महिलेला मानधन न दिल्याच्या कारणावरुन नऊ ते दहा जणांनी बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांत पाच जणांसह अनोळखी चार ते पाच जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. तर सीआरपी महिलेला वाईट बोलून दमदाटी करत धमकी दिल्याने तालुका अभियान व्यवस्थापकावरही अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याबाबत तालुका अभियान व्यवस्थापक नंदलाल पोपटराव कोकाटे (वय 40) यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की ते पंचायत समितीमधील त्यांच्या कक्षात काम करत असताना एका सीआरपी महिलेविषयी तक्रार असल्याने गटविकास अधिकार्‍यांनी नोटीस दिली होती. त्यास उत्तर न दिल्याने संबंधित महिलेचे मानधन थांबवले होते. दरम्यान, सोमवारी दुपारी कोकाटे कामकाज करत असताना शरदनाना थोरात आणि त्या महिलेचे पती हे कार्यालयात आले. तेव्हा शरद थोरात यांनी महिलेला मानधन का दिले नाही? अशी विचारणा केली. त्यावर त्यांच्याविषयी तक्रार असल्याने गटविकास अधिकार्‍यांनी नोटीस दिलेली आहे. मात्र, नोटिसीला उत्तर न दिल्याने मानधन रोखून धरले असल्याचे सांगितले. तेव्हा थोरात यांनी आम्ही खुलासा देणार नाही तुम्हाला काय करायचे ते करुन घ्या असे म्हणाले. यावरही त्यांना समजून सांगत असताना याचा राग आल्याने थोरात यांनी डोक्यात चापटीने मारले. तेव्हा कार्यालयातील सहकार्‍यांनी वाद सोडवला.त्यानंतर घडलेल्या घटनेबाबत कोकाटेंनी वरिष्ठांना सांगितले आणि पुन्हा कक्षात कामकाज करत बसले. यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी अडीच वाजेच्या सुमारास सात ते आठजण कार्यालयात घुसले आणि चार ते पाच जणांनी लाथाबुक्क्यांनी जोरात मारहाण करण्यास सुरुवात केली. दमदाटी करुन तू शरदनाना थोरातला ओळखत नाही का? तुला काय करायचे ते कर बघून घेतो असे म्हणून पुन्हा मारहाण केली. तेव्हा पुन्हा कार्यालयातील सहकार्‍यांनी त्यांच्या तावडीतून सोडवले. या घटनेनंतर थेट शहर पोलिसांत धाव घेवून नंदलाल कोकाटे यांनी फिर्याद दिली.

त्यावरुन शरदराव थोरात, अभिषेक थोरात, ऋषीकेश थोरात, अक्षय भालेराव, शिवामृत भोकरे व इतर चार ते पाच अनोळखी व्यक्तींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, सीआरपी महिलेने माझे मानधन का रोखले अशी विचारणा केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करुन नंदलाल कोकाटे यांनी वाईट बोलून दमदाटी करत धमकी दिली. याप्रकरणी सीआरपी महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी कोकाटे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles