कांद्याच्या प्रश्नावर संसदेत खा. लंके यांचे आंदोलन ; हमीभाव, निर्यात मुक्तता व सीबीआय चौकशीची मागणी

कांद्याच्या प्रश्नावर संसदेत खा. लंके यांचे आंदोलन

हमीभाव, निर्यात मुक्तता व सीबीआय चौकशीची मागणी

अहिल्यानगर : प्रतिनिधी

देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खासदार नीलेश लंके यांनी मंगळवारी संसद भवन परिसरात जोरदार आंदोलन केले. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळावा, वाढत्या खर्चावर नियंत्रण यावे आणि कांदा बाजारपेठेला स्थैर्य मिळावे, या उद्देशाने हे आंदोलन करण्यात आले.

सध्या कांदा उत्पादक शेतकरी वाढत्या उत्पादन खर्चामुळे आणि बाजारातील अस्थिर दरांमुळे मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. त्यातच केंद्र सरकारच्या बदलत्या निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार लंके यांनी संसद परिसरात आंदोलन करत केंद्र सरकारसमोर विविध मागण्या मांडल्या.

आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव लागू करावा, दर्जेदार बियाणे स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावेत,
बियाण्यांच्या किंमतींवर नियंत्रण आणावे,
कांद्यावरील निर्यात बंदी हटवून निर्यात पूर्णपणे मुक्त करावी, कांद्याची निर्यात वाढीसाठी ठोस धोरण आखावे, नाफेड व एनसीसीएफमार्फत झालेल्या कांदा खरेदी प्रक्रियेची सीबीआयमार्फत चौकशी करावी यांचा समावेश आहे.

यावेळी बोलताना खासदार नीलेश लंके यांनी सांगितले की, “देशातील लाखो कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांच्या घामाचे योग्य मोल मिळवून देण्यासाठी हा लढा उभारला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील.”

या आंदोलनात खा. भास्कराव भगरे, खा. बजरंगबप्पा सोनवणे, खा. शोभाताई बच्छाव, खा. बाळ्या मामा म्हात्रे आणि खा. धैर्यशील मोहिते यांसह अनेक खासदारांनी सहभाग घेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकजूट दर्शवली. संसद भवन परिसरात झालेल्या या आंदोलनामुळे देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज अधिक तीव्र झाला असून, केंद्र सरकारने यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles