संगमनेर तहसील कार्यालयातील लिपिक कैलास विठ्ठल खाडे (रा. अकोले) याला 13 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि.26) रंगेहात पकडले. अवघ्या आठवडाभरात महसूल विभागात झालेल्या या दुसऱ्या मोठ्या कारवाईने खळबळ उडाली आहे.तक्रारदाराला त्यांच्या मालमत्तेचा वाटप पत्राचा आदेश करून हवा होता. यासाठी आवश्यक असलेली सर्व कायदेशीर कागदपत्रे पूर्ण असतानाही, लिपिक कैलास खाडे याने या कामासाठी 13 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने वारंवार विनंती करूनही खाडेनी काम करण्यास नकार दिला. काम करण्याच्या बदल्यात लाचेची मागणी केली. अखेर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, गुरुवारी 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या परिसरात सापळा रचण्यात आला. तहसील कार्यालयातील अर्धन्यायिक सुनावणीचे काम आटोपून बाहेर आलेल्या लिपिक खाडे याने चहाच्या टपरीवर तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारली. पैसे मोजत असतानाच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला बेड्या ठोकल्या.संगमनेरमध्ये गेल्या काही दिवसांपासून महसूल विभागातील भ्रष्टाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, काही दिवसांपूर्वीच एका तलाठ्यावरही कारवाई झाली होती. गुरुवारी केलेल्या कारवाईत पोलिस उपाधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक छाया देवरे आदींनी सहभाग घेतला.


