जवळपास दोन दशकं काँग्रेस पक्षासाठी काम केलेल्या आणि सध्या विधानपरिषदेत अपक्ष आमदार असलेल्या सत्यजित तांबे यांनी काँग्रेसची अंतर्गत कार्यप्रणाली तसेच केंद्रीय नेत्यांसोबत राज्यपातळीवर असणाऱ्या नेत्यांचा संबंध यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी खासदार राहुल गांधी यांचे नाव घेत हे सर्व मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केले आहेत.सत्यजित तांबे यांनी सकाळ वृत्तपत्र समूहाला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर भाष्य केलं. राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना एका तासाच्या आत भेटून दाखवावं, असं खुल आव्हानच तांबे यांनी या मुलाखतीत दिलं.
मी छातीठोकपणे सांगतो की राज्यातल्या काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने राहुल गांधी यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटायला जाऊ दाखवावं. प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने मला हे करून दाखवावं. हे सोडा कोणत्याही नेत्याने मला राहुल गांधी यांना फक्त फोन करून दाखवावं, असं खुलं आव्हान सत्यजित तांबे यांनी दिलं. तसेच, अशा प्रकारचं नेतृत्त्व असेल तर खालच्या कार्यकर्त्यांनी कोणाच्या जीवावर लढाई करायची? असा सवालही तांबे यांनी उपस्थित केला.
“सत्यजित तांबे काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आले, त्यांनी याचं भान ठेवावं”, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
सत्यजित तांबे यांच्या विधानावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं की, “राहुल गांधी यांनी किमान १०० वेळा त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला असेल. त्यांच्या निवासस्थानी ते मुक्कामी देखील होते. पण आता सत्यजित तांबे यांची जी राजकीय अस्वस्थता आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ते विधान केलं असेल. तसेच आणखी काय कारणे आहेत हे मला सांगता येणार नाही. राहुल गांधी हे कधीही उपलब्ध असतात, कामांच्या बाबतीत ते सर्वांना भेटत असतात. सत्यजित तांबे यांचं हे विधान मनाला न पटणारं आहे. तसेच सत्यजित तांबे हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर ते निवडून आलेले आहेत याचं त्यांनी भान ठेवावं”, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.


